सोलापूर : जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात व धाराशिव जिल्ह्यात बिबट्यांचा वावर असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या शोधासाठी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला होता. मात्र या कॅमेऱ्यात चक्क वाघ दिसला. यवतमाळमधील टिपेश्वर येथील हा वाघधाराशिवमार्गे बार्शी तालुक्यात दाखल झाला. आता तो पुन्हा धाराशिवकडे गेला असल्याचे वनविभागाकदन सांगण्यात आले.
पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी वनविभागाकडे केल्या होत्या. त्यामुळे वनविभागाने येडशी परिसरात ट्रॅप कॅमेरा लावला. या कॅमेऱ्यामध्ये वाघ दिसून आला. या वाघाचे छायाचित्र डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्था यांच्याकडे देण्यात आले. त्यांच्याकडे देशातील वाघांची माहिती आहे. पडताळणी केली असता बार्शी तालुक्यात आलेला वाघ हा मूळ यवतमाळ तालुक्यातील टिपेश्वरचा असल्याचे स्पष्ट झाले.
वाघ आला कुठून?
टिपेश्वर अभयारण्यातील टी-२२ वाघिणीपासून २०२२ मध्ये या वाघाचा जन्म झाला. हा वाघ दोन वर्षांचा असून, तो तरुण झाला आहे. आपला स्वतःचा प्रदेश शोधण्यासाठी व मादीच्या शोधात तो फिरत बार्शी तालुक्यात पोहोचला.
५०० कि.मी. प्रवास
वाघ दिवसा ३० ते ४० किलोमीटरचा प्रवास करू शकतो. बार्शी तालुक्यात आढळलेला वाघ हा यवतमाळ येथून सुमारे ५०० किलोमीटरचे अंतर पार करुन सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला आहे.