पंढरपुरातील नगरसेवक संदीप पवार यांचा १८ मार्च २०१८ रोजी स्टेशन रोडवरील श्रीराम हॉटेलमध्ये बंदुकीने गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. ४१ महिन्यांपासून फरार असलेला संशयित आरोपी सुनील वाघ याला पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठ्या शिताफीने २८ ऑगस्ट रोजी पेरिया पटणा (जि. म्हैसूर, कर्नाटक) येथून ताब्यात घेतले आहे. त्याला २९ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले असता, पुन्हा तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली. गुरुवारी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे त्याला मोक्क्याच्या गुन्ह्यांतर्गत कळंबा (कोल्हापूर) येथील जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुनील बनसोडे, शोएब पठाण, राजेश गोसावी, समाधान माने, रामकिसन खेडकर हे कर्मचारी वाघ याला कळंब येथे घेऊन गेले आहेत.
यामुळे सरजी गँगच्या चाललेल्या सुप्त हालचाली मंदावणार आहेत. त्याचबरोबर १२ दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान आणखी किती गुन्ह्यांसंदर्भातील माहिती पोलिसांच्या हाती लागली, याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.
फोटो : सुनील वाघ याला कळंबा (कोल्हापूर) येथे घेऊन जाताना पोलीस कर्मचारी.