सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार, मनरेगा, सिंचन विहिरी आदी कामे चांगली झाली आहेत. मात्र यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अवघा ३८ टक्के पाऊस झाला आहे. आगामी काळात टंचाईची परिस्थिती उद्भवू शकते याचा विचार करून शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करण्याच्या सूचना देत जिल्ह्यातील विकासाला गती देवून दोन महिन्यात उर्वरीत विकास कामे पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.
सोलापूर जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकपाणी व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज बहुउद्देशीय सभागृहात घेतला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, खासदार शरद बनसोडे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील उपस्थित होते.
या बैठकीत मुंबई येथून मुख्य सचिव डी.के.जैन यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात यावर्षी अवघा ३८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ९१ मंडलापैकी ६८ मंडलात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तुलना करता ही स्थिती सन २०१५ सालाशी साधर्म्य असणारी आहे. दुष्काळाच्या संदर्भात केंद्र शासनाने २०१६ मध्ये काही वैज्ञानिक निकष घालून दिले आहेत. यामध्ये कमी पर्जन्यमानाबरोबरच दोन पावसातील खंडीत अंतराचा समावेश आहे. तसेच किमान १० गावात पीक कापणीचे प्रयोग करून त्यांचे विश्लेषण करून टंचाई घोषीत करण्याबाबत निर्णय देण्यात येणार आहे. या वैज्ञानिक निकषांच्या आधारावर आपली पाहणी सुरू असून त्याचे अहवाल आल्यानंतरच याबाबतचा योग्य निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले़