सोलापूर : जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यासाठी शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली. अक्कलकोट, पंढरपूर, कुर्डूवाडी, मंगळवेढा व अकलूज बाजार समितीसाठी आज मतदान होत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे.
दरम्यान, बाजार समितीसाठी सोसायटी सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत ८० ते ९० टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अकलूजमध्ये मोहिते-पाटील विरोधात सर्वपक्षीय, कुर्डूवाडीत आ. संजयमामा शिंदे विरोधात सर्वपक्षीय, पंढरपुरात परिचारक गटाविरोधात अभिजित पाटील गट, मंगळवेढ्यात आवताडे विरोधात अभिजित पाटील गट व अक्कलकोटमध्ये आ. सचिन कल्याणशेट्टी विरोधात माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे आघाडी अशी लढत होत आहे. मतदान केंद्रावर ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सर्वत्र शांततेत मतदान सुरू असल्याचे सांगण्यात आले.