सोलापूर : अलीकडचा रस्ता या पोलीस ठाण्याचा, तर तिकडचा रस्ता त्या ठाण्याचा... कुठला भाग कुठल्या हद्दीत याचा खेळ सातही पोलीस ठाण्यात रंगलेला असतो. कुणी तक्रार अथवा फिर्याद द्यायला आला तर त्याला घटना कुठे घडल्याचे विचारतात. घटनास्थळ समजले तर पोलीस छातीठोकपणे सांगत नाहीत की ‘आमचीच हद्द आहे’. हद्द समजावून घेण्यात वेळ लावणारे पोलीस नंतर तक्रारदारांची तक्रार नोंदवून घेण्याचा मेळ घालतात. याचा नाहक त्रास तक्रारदाराला होत असतो.
पोलीस आयुक्तालयांतर्गत एकूण सात पोलीस ठाणे आहेत. फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे, सदर बझार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगरवस्ती पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. बहुतांश ठिकाणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फक्त एका रस्त्याचे अंतर आहे. बऱ्याच वेळा गुन्हे घडतात. मात्र, तक्रारदार जेव्हा पोलीस ठाण्यात जातात, तेव्हा त्यांना गुन्हा कुठे घडला याची विचारणा करतात. पत्ता जर आपल्या संबंधित पोलीस ठाण्याचा असेल तर तेथे तक्रार घेतात. मात्र जर हद्द दुसरी येत असेल तर त्यांना हद्दीतील संबंधित पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देतात. तेथे गेल्यानंतरही बऱ्याच वेळा ही हद्द आपल्या पोलीस ठाण्यामध्ये येते का? हे पाहिले जाते. नंतर मग गुन्हा काय घडला, हे पाहिले जाते. गुन्हा दाखल करून घेतला जातो. असे अनुभव तक्रारदाराला अनेकवेळा येताना दिसून येतात. अनेक वेळा खून घडतो त्याची माहिती पोलिसांना कळवली जाते. पोलीस घटनास्थळी येतात तेव्हा समजते की ही हद्द आपली नाही. पोलीस संबंधित पोलीस ठाण्याला याची माहिती देतात. असे प्रकार अनेकवेळा जोडभावी पेठ पोलीस ठाणे व तालुका पोलीस ठाण्याच्या बाबतीत घडले आहेत.
ही घ्या उदाहरणे...
तक्रार घेतली नाही
० विजापूर वेस ते बेगम पेठ पोलीस चौकीदरम्यान रस्त्यावरून जात असताना अज्ञात मोटारसायकलस्वाराने धडक दिली होती. पायाला थोडा मार लागला होता. याची तक्रार देण्यासाठी मी प्रथमत: जेलरोड पोलीस ठाण्यात गेलो होतो. तेथे त्यांनी धडक कोठे झाली याची विचारणा केली तेव्हा त्यांनी मी रस्त्याच्या मध्ये झाली असे सांगितले. तेव्हा त्यांनी मला फौजदार चावडीला जाण्यास सांगितले. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जाण्यास सांगण्यात आले. तेथे गेलो तेव्हा त्यांनीही असेच सांगितले शेवटी तक्रार न देता मी निघून आलो.
तक्रारदार
अकस्मात निधनाची नोंद कुठे करायची?
सम्राट चौक ते कस्तुरबा मंडईदरम्यान असलेल्या रोडच्या कडेला एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला होता. पहिल्यांदा अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची माहिती स्थानिक कार्यकर्त्याने प्रथम फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली, तेव्हा त्यांना जोडभावीला कळविण्याचा सल्ला दिला. जोडभावी पेठ पोलिसांना सांगण्यात आले. शेवटी सामाजिक कार्यकर्त्याने ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली अन् अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला.
सात पोलीस स्टेशन असल्याने अडचणी येत नाहीत
० शहरात फक्त सात पोलीस स्टेशन आहेत, त्यामुळे जरी चुकून दुसऱ्या पोलीस ठाण्यात तक्रारदार गेला तर त्याला तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात पाठवले जाते. त्यामुळे काही किरकोळ तक्रारी सोडल्यातर तक्रार घेतली जात नाही असे होत नाही.
प्रत्येक पोलीस ठाण्याला हद्द ठरवून देण्यात आली आहे. ज्या हद्दीत गुन्हे होतात त्याच संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी लागते. तक्रारदाराला माहीत नसल्यास त्याला सांगितले जाते. गंभीर प्रकार असेल तर आरोपीला पोलीस ताब्यात घेतात व संबंधित पोलिसांच्या ताब्यात देतात. मात्र गुन्हा ज्या त्या पोलीस ठाण्यातच दाखल केला जातो.
- एकूण पोलीस ठाणे ०७
- पोलीस अधिकारी १४६
- पोलीस कर्मचारी २२००