सोलापूर : दोन खासगी सावकारांच्या मानसिक त्रासाला कंटाळून मारुती मंदिराच्या पुजाऱ्याने राहत्या घरात दोरीने लोखंडी ॲन्गलला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दोन सावकारांचा उल्लेख आढळला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लक्ष्मण उर्फ दादा दत्तात्रय हजारे व जिजाबाई सुभाष घळके या दोघांविरुद्ध बार्शी तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दि. ४ जुलै रोजी सकाळी सव्वासहा वाजण्यापूर्वी कव्हे (ता. बार्शी) येथे घडली.
नागनाथ महादेव गुरव (वय ५८) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मयताचा मुलगा धन्यकुमार नागनाथ गुरव (वय १८, रा.कव्हे, हल्ली रा. तिरवंडी, ता. माळशिरस) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, नागनाथ महादेव गुरव हे मारुती मंदिराचे पुजारी आहेत. गावातील लक्ष्मण हजारे याच्याकडून त्यांनी १० हजार रूपये १० टक्क्यांनी घेतले होते. तू गाव सोडून जा, तुझा मुलगा गावी आला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत होते. तसेच जिजाबाई घळके हिच्याकडून १५ हजार रूपये १० टक्के व्याजाने घेऊन त्यांना २१ हजार रूपये परत केले असताना देखील त्रास देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दोघांच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी मिळून आली आहे. त्यात या दोघांच्या नावांचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले. याबाबत बार्शी तालुका पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५२, ३५१(२), ३(५), सावकारी अधिनियम ४९, ४५ नुसार गुन्हा नोंद झाला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बालाजी वळसणे करत आहेत.