बॅरेजेसच्या कामाचे भूमिपूजन कसे काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : राज्य सरकारला कोणतीही कल्पना नाही. कोणालाही भूमिपूजनाचे निमंत्रण नाही. राज्याचे जलसंपदामंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तरीही सरकारला बाजूला ठेवून भूमिपूजन कसे काय केले जाते? अशी तक्रार माजी आमदार दीपक साळुंखे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.
वडकबाळ येथील बंधाऱ्याची उंची वाढवण्यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत बंधाऱ्याची चर्चा सुरू असताना तिर्हे येथील बॅरेजेसच्या भूमिपूजनाचा विषय चर्चेत आला. जलसंपदा मंत्र्यांनी या भूमिपूजन कार्यक्रमाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी उत्तर देण्यापूर्वी दीपक साळुंके यांनी हस्तक्षेप करीत असा कार्यक्रम कसा काय केला जाऊ शकतो? हा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला. या बंधाऱ्यासाठी राष्ट्रीय महामार्गाने निधीची तरतूद केली आहे. जलसंपदा विभागाचा त्यात फारसा रोल नाही. केवळ बंधाऱ्याचे डिझाईन आपण करून देतो, असे उत्तर अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांनी दिले.
या उत्तराने साळुंके यांचे समाधान झाले नाही. ते म्हणाले, काहीही असले तरी राज्य सरकारचा काहीच संबंध न ठेवता हा कार्यक्रम करणे गंभीर आहे. अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली पाहिजे. तसे असेल तर राज्य सरकारने आणि जलसंपदा विभागाने या कामासाठी कोणतेही सहकार्य करायला नको आहे, असा सल्लाही त्यांनी देऊन टाकला.
बैठकीला उपस्थित आमदार यशवंत माने, काका साठे, माजी आमदार राजन पाटील यांच्यासह नेत्यांनी त्यावर बोलण्याचे टाळले तर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रसंगावधान राखत मतप्रदर्शन करण्याऐवजी स्मित हास्य केले. चर्चा थांबली.