सोलापूर : लोकमतमध्ये गाजलेल्या ‘चला लग्नाला’ या सदराच्या समारोपानिमित्त आयोजित पाच अंध जोडप्यांच्या विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहणार्या वºहाडी व निमंत्रितांना तिरुपतीचा प्रसाद म्हणून प्रसिद्ध असलेला लाडू देण्यात येणार आहे. लोकमतने राबविलेला हा आगळावेगळा उपक्रम लोकांमध्ये चर्चेचा ठरला आहे. बालाजी सरोवर पंचतारांकित हॉटेलमध्ये २४ मे रोजी सायंकाळी ७ वाजून २ मिनिटांनी होणारा अक्षता सोहळा लक्षवेधक ठरणार आहे. दुपारी चार वाजता वधू-वर व वºहाडींचे महानगरपालिका परिवहनच्या बसमधून लोकमत कार्यालयात आगमन होईल. तेथून सवाद्य वरात निघेल. वरातीमध्ये लोकमत परिवार, हितचिंतक, निमंत्रित, नॅबचे (दि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा सोलापूर) व रोटरी क्लब व दमाणी अंधशाळेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद व परगावाहून आलेले वºहाडी सहभागी होतील. वरात आणि अक्षता सोहळ्याबरोबरच आता तिरुपतीचा लाडू हा चर्चेचा विषय ठरला आहे. माजी महापौर व पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष जनार्दन कारमपुरी यांनी याची जबाबदारी उचलली आहे. खास तिरुपती येथील आचार्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या आचारास पाचारण करण्यात आले आहे. मार्कंडेय मंदिरात तिरुपतीचा लाडू बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे. आचारी, लाडू बांधणार्या महिलांनाही हा विवाह सोहळा औत्सुक्याचा विषय ठरला आहे. या लग्नासाठी रंगीबेरंगी अक्षता तयार करण्याचे काम शैला गुडपल्ली यांच्या घरात सुरू आहे. वºहाडींच्या स्वागतासाठी दमाणी व नॅब अंधशाळेने जोरदार तयारी केली आहे. २४ मे रोजी सकाळी हळदीचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचीही जय्यत तयारी झाली आहे. दरम्यान या उपक्रमास भास्कर थोरात, राजेश शिंगटे, आप्पासाहेब शेवाळे, संदीप गुरमे, शुकुर फुलारी, सादिक दारुवाले, अॅड. संतोष न्हावकर, सिद्धेश्वर पार्क महिला बचत गट, जुळे सोलापूर, आरएनए इव्हेंटच्या राही आरसीद, पूजा ब्युटी पार्लरच्या मानसी हबीब, सौ. शालिनीताई नारायणराव पवार (खामगाव, जि. बुलडाणा) यांच्या स्मरणार्थ संजय पवार (सोलापूर), राज्य उत्पादन शुल्क अधिकारी वर्ग यांनी मदत केली.
--------------------
डोळस माणसांना कोणीही मदत करेल. लोकमत या वृत्तपत्राने पुढाकार घेऊन पाच अंध बांधवांचा विवाह साकारला. ही सामाजिक बांधिलकी आहे. या उपक्रमास प्रत्येकाने साथ दिलीच पाहिजे. माझ्या आयुष्यातील हा सर्वोच्च क्षण असून, दाम्पत्यास खास लाडू भेट देणार आहे. - जनार्दन कारमपुरी माजी महापौर
-------------------------------------
वेगळ्या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जोपासून लोकमतने पाच अंध बांधवांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी दिली आहे. अनेक लग्नाचे व्हिडीओ शूटिंग केले; पण अंध दाम्पत्यांच्या चेहर्यावरील भाव टिपण्याचा हा योग पहिल्यांदाच मिळणार आहे. - राजेश कटकधोंड व्हिडीओग्राफर, के. राज फोटो