कोरोना स्थितीमुळे येथील विविध शोरूमकडून ग्राहकांनी घेतलेल्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी गाड्यांचे पासिंग थांबले होते. परंतु माढा तालुक्यातील अनेक ग्राहकांच्या गाड्या या काळात रस्त्यावरून विना पासिंगच्या धावल्या आणि त्यामुळे पोलिसांकडूनही दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागले. कोरोना कमी होताच कुर्डूवाडीत सोमवारी पुन्हा अकलूज परिवहन विभागाकडून वाहने पासिंग करण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात आला. त्यामुळे पासिंगविना रखडलेल्या शेकडो दुचाकी, चारचाकी गाड्यांची तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले. यात दुचाकी व ट्रॅक्टर यांचा समावेश सर्वाधिक असल्याचे आढळले. परिवहन विभागाकडून आलेल्या परिवहन निरीक्षकांनी मात्र अवघ्या दोन तीन तासांतच एका ठिकाणी खुर्चीवर बसून दोन चार स्थानिक एजंटांच्या मदतीने शेकडो गाड्यांचे व्हेरिफिकेशन करून जमलेली गर्दी कमी केली.
कुर्डूवाडी येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात सोमवारी हा कॅम्प घेण्यात आला. सकाळी दहा वाजल्यापासून येथे नवीन गाड्या घेतलेल्या नागरिकांनी आपल्या वाहनांसह गर्दी केली होती. परिवहन निरीक्षक संदीप मुरकुटे हे साडेअकरा वाजता कॅम्प स्थळी आले. त्यावेळी अनेक दिवसांपासून पासिंग न झाल्याने नागरिकांनी आपल्या वाहनांची त्यांच्यापुढे गर्दी केली. यावेळी त्यांनी शेकडोंच्या घरात असणारी वाहने पाहून झाडाखाली खुर्ची टाकली व गेट मधून ठराविक वाहने आत घेत पटापट वाहने व उपलब्ध कागदपत्रे व्हेरिफिकेशन केली.
---
पुढील वेळी होणार नाही गर्दी
यावेळी बहुसंख्येने असणारे ट्रॅक्टर व दुचाकी गाड्या विश्रामगृहाच्या गेटवर गर्दी करून उभ्या होत्या. कोरोना कमी झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅम्प आयोजित झाल्याने ही गर्दी दिसून आली. पुढील कॅम्प पासून गर्दी होणार नाही असे परिवहन निरीक्षक मुरकुटे यांनी सांगितले.
...............
२१कुर्डूवाडी-पासिंग १,२,३
कुर्डूवाडीत कोरोनामुळे तीन महिन्यांपासून बंद झालेला अकलूज आरटीओ कॅम्प पुन्हा सोमवारी सुरू झाल्यानंतर विश्रामगृहाच्या आवारात शेकडो नवीन वाहनांच्या पासिंग करण्यात आल्या. त्यावेळी वाहनधारकांची तोबा गर्दी झाल्याचे दिसत आहे.
----