आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील आज महत्त्वाचा दिवस आहे. आज दुपारी सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा पार पडणार आहेत.
तत्पूर्वी आज सकाळी नऊ वाजता यात्रेतील प्रमुख मानकरी हिरेहब्बू वाड्यापासून ढोल, ताशाच्या गजरात नंदीध्वजाच्या मिरवणुका निघाल्या आहेत. नंदीध्वज व पालखीतील ग्रामदैवत श्री च्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दुतर्फ रस्त्यावर उभे आहेत. नंदीध्वज मिरवणूक मार्गावर संस्कार भारतीच्यावतीने रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. एकूणच सोलापूर शहरात आज सकाळपासून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आज होणाऱ्या अक्षता सोहळ्याला साधारणतः पाच लाखापेक्षा जास्त भाविक उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला असून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.