सोलापूर : अक्कलकोट-सोलापूर महामार्गावर वळसंग गावाजवळ उभारण्यात आलेल्या टोल प्लाझावर रविवारी मध्यरात्रीपासून आकारणी सुरू करण्यात आली. या टोलमुळे स्थानिक आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी वळसंगजवळ उभारण्यात आलेल्या टोल प्लाजाचे बांधकाम पूर्ण झाले. कोणत्याही दिवशी वाहनावर टोल आकारण्याची तयारी करण्यात आली होती. शनिवारी रात्री उद्यापासून टोल आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. रविवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले . चार चाकी (लाईट ) प्रवासी वाहनांना टोलमधून वगळण्यात आले आहे. केवळ व्यावसायिक वाहनांकडून टोलची रक्कम आकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अक्कलकोट , गाणगापूर आणि तुळजापूर या धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या भाविकांना त्याचा फारसा फटका बसणार नाही; मात्र स्थानिकांवर भुर्दंड बसणार आहे.
-------
नियमांना अपवाद असल्याने नाराजी
दोन टोल नाक्यातील किमान अंतर ४० किलोमीटर पेक्षा अधिक असले पाहिजे. हा नियम आहे. वळसंग येथे नव्याने सुरू करण्यात आलेला टोल नाका त्याला अपवाद आहे. कुंभारी येथे आधीच टोल नाका सुरू आहे. कुंभारी-वळसंग टोल नाक्यातील अंतर ४० किमी पेक्षा कमी आहे. त्यामुळे वळसंग जवळ सुरू केलेल्या टोलबाबत वाहनधारकातून नाराजीचा सूर आळवला जात आहे.