मोडनिंबसह अरण, जाधवाडी, बैरागवाडी, खंडाळी, पापरी, आष्टी, ढेकळेवाडी, आहेरगाव, अकुंबे या भागातील शेतकरी टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी २० ते २५ रुपये किलो दराने व्यापारी टोमॅटो खरेदी करीत होते, मात्र सध्या प्रतिकिलो १० रुपये दराने व्यापारी खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लावगडीसाठी केलेला खर्चसुद्धा निघणे अवघड झाल्याचे बाळासाहेब माने या शेतकऱ्याने सांगितले.
नाशवंत असल्याने विकणे आवश्यकच
सुरुवातीला टोमॅटोचा दर जास्त होता, मात्र अचानक व्यापाऱ्यांनी दहा रुपये म्हणजे निम्म्यापेक्षा कमी दराने खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नाइलाजास्तव टोमॅटो विकावे लागत आहे, कारण दोन ते तीन दिवस जरी झाडावर टोमॅटो ठेवला तरी तो खराब होतो. टोमॅटो नाशवंत असल्यामुळे विकणे आवश्यकच आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.