सोलापूर : देशातून पोलिओचे उच्चाटन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे रविवार, ३१ जानेवारी रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील ४ लाख ५२ हजार ७३९ बालकांना राष्ट्रीय पल्स पोलिओचा डोस पाजण्याची मोहीम घेण्यात येणार आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. पल्स पोलिओ मोहिमेत बालकांना पोलिओचा डोस पाजण्यासाठी ३ हजार २२७ बुथ स्थापन करण्यात आले असून, सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत कर्मचारी बालकांना डोस पाजविणार आहेत. याव्यतिरिक्त २१२ ट्रान्झीट युनिट व १३१ मोबाईल टीम कार्यरत राहणार आहेत. मोहिमेत आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी कर्मचारी अशी ७ हजार ५३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत राहणार आहे. रविवारी डोस न घेतलेल्या बालकांना २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान डोस देण्यात येणार आहे. या काळात घरोघरी, वाडीवस्ती, वीटभट्टी, ऊसतोड टोळींतील बालकांचा शोध घेण्यात येणार आहे. सर्व पालकांनी आपल्या घरातील व शेजारील बालकांना केंद्रावर नेऊन पोलिओचा डोस पाजावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी केले आहे.
- ० ते ५ वयोगटातील लाभार्थी - ४५२७३९
- पोलिस डोस प्राप्त - ५५0000
- एकूण बुथ - ३२२७
- आरोग्यसेवक - ८६३
- पर्यवेक्षक - ११८१
- अशी चालेल मोहीम
- आरोग्य संस्था - ५१९
- मोबाईल पथक - १३१
- ट्रॉझींट पथक - २१२
- लसीकरणाची वेळ - सकाळी ८ ते सायं. ५ वाजेपर्यंत
जिल्ह्यात आढळले होते ३ रुग्ण
राज्यात १९८७ साली ३१२७ रुग्ण होते. सन १९९६ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सन २00८ मध्ये २ व त्यानंतर आतापर्यंत पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही.
देशातून पोलीओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी १९९५-९६ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात पाच वर्षांच्या आतील बालकांना आजारी किंवा नवीन जन्म असेल तरीही पोलिओ लसीची अतिरिक्त मात्रा ठरावीक अंतराने देणे यालाच पल्स पोलिओ लसीकरण मोहीम असे म्हटले जाते.
सोलापूर जिल्ह्यात सन १९९८ मध्ये २ आणि सन १९९९ मध्ये १ असे ३ रुग्ण आढळले होते. त्यानंतर मात्र पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
पोलिओ लसीकरणाची तयारी झाली असून यासाठी आरोग्य कर्मचारी, शिक्षकांबरोबर २८०० अंगणवाडी, २७६३ आशा कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज ठेवला आहे. तलाठी, ग्रामसेवक यांचीही मदत घेण्यात आली आहे. सर्वांनी आपल्या बालकांना आवर्जून डोस द्यावा.
डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी