यशवंत सादूल
सोलापूर : शाळा, महाविद्यालय, पदवी, पदविका, मेडिकल, इंजिनिअरिंग, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लागणारी पुस्तके निम्या किमतीत खरेदी करून त्याद्वारे आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपडणारे विद्यार्थी नवी पेठेतल्या जुन्या पुस्तकांच्या बाजारात दिसून येतात. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवत या मुलांचे भविष्यही उज्ज्वल होत आहे.
वर्षाकाठी बारा लाख पुस्तकांची विक्री
शालेय अभ्यासक्रमाच्या सर्व इयतेची, महाविद्यालयीन सर्व शाखेच्या पुस्तकांसह, इंजिनिअरिंग, मेडिकल, पदवी, पदविका, एमपीएससी, यूपीएससी, नेट, जेईई, बीएड, डीएड, शेतीविषयक पदवी, कायदेविषयक, सीए, इनसायक्लोपीडिया, डिक्शनरी याशिवाय साहित्यविषयक कथा, कादंबरी असे जवळपास बारा लाख पुस्तकांची विक्री या ठिकाणी होते, असे विक्रेते संतोष रजपूत यांनी सांगितले.
----------
मागील पन्नास वर्षांपासून भरतो बाजार
शहर आणि जिल्ह्यासह उस्मानाबाद येथील कठीण प्रसंगातही जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निम्म्याहून कमी किमतीत पुस्तके उपलब्ध करून देणारा हा बाजार मागील पन्नास वर्षांपासून नवी पेठेत भरत आहे. बारा ते पंधरा विक्रेते असून सर्वात जुने विक्रेते विठ्ठलसिंग राजपूत मागील पन्नास वर्षांपासून आहेत. गणेश चव्हाण, विशाल शिंदे, सुनील चव्हाण, चरण ठाकूर, विजयसिंग चव्हाण, इरेश गुंजेटी, अमित वाघमारे हे मागील तीस वर्षांपासून आहेत.
---------
पुण्यातून आणि स्थानिक विद्यार्थ्यांकडून खरेदी
येथील विक्रेते स्थानिक पातळीवर शैक्षणिक वर्ष संपलेल्या विद्यार्थ्यांकडून क्रमिक पुस्तके खरेदी करतात. स्पर्धा परीक्षा, सी ए, कायदेविषयक अशी पुस्तके पुण्याहून आणतात. या पुस्तकांची दुरुस्ती करून त्यांना कव्हर घालून ही पुस्तके मूळ किमतीच्या निम्म्या किमतीत विकतात.
----------
भविष्य शोधणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी...
शिकण्याची अफाट इच्छाशक्ती असलेले, पार्ट टाइम काम करीत शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या पण आर्थिक दृष्टीने दुर्बल असलेले विद्यार्थी जुन्या पुस्तकांतून आपले भविष्य शोधत या बाजारात फिरताना दिसून येतात. कमी किमतीत मिळालेल्या पुस्तकाद्वारे अभ्यास करीत आपले करिअर करण्यासाठी धडपडणारी मुले या बाजारात आढळून येतात.