दुधनीच्या बाजार समितीत शेतमालाला इतर बाजार समित्यांपेक्षा उच्चांकी दर मिळत आहे. सोलापूरसह विजयपूर, कलबुर्गी, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी यावर्षी उच्चांकी दर दिलेल्या दुधनीच्या बाजार समितीमध्ये खरीप हंगामातील पिके विक्रीसाठी आणत आहेत. यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, तूर या पिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तुरीचा हंगाम संपून दोन महिने उलटले तरी अजूनही तुरीची आवक सुरूच आहे. शासनाचा हमीभाव ५००० पेक्षा जास्त आहे. मात्र, दुधनी बाजार समितीमध्ये त्यापेक्षा जास्तीचा दर मिळत आहे. सद्य:स्थितीत प्रतिक्विंटल ६८०० रुपये दर आहे. काही दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल ७२०० रुपये असा विक्रमी दर मिळाला होता. अतिवृष्टीमुळे तुरीचे उत्पादन कमी झाले आहे. तरीही दर चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
चाळणी नाही, काट्यासोबतच पट्टी
शेतकरी संपूर्ण वर्ष काबाडकष्ट करतो. शेवटी त्याच्या मालाला काटेकोरपणे निरीक्षण करून सौदा करण्याची प्रक्रिया दुधनी बाजारात होत नाही. शेतकऱ्यांचे हित जोपासत व्यापार प्रक्रिया पार पडते. याठिकाणी चाळणी न करता काटा करून जागेवरच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते. म्हणूनच शेतकरी मोठ्या आशेने दुधनीच्या मार्केटकडे येतात, असे व्यापारी गुरुशांत हौशेट्टी यांनी सांगितले.
कोट ::::::::
गेल्या अनेक वर्षांपासून दुधनी बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जातात. गतवर्षी अपेक्षेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी याठिकाणी व्यवहार केले आहेत. यापुढील काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करणार आहे.
- प्रथमेश म्हेत्रे,
सभापती, दुधनी कृषी समिती
०१दुधनी
ओळी
दुधनी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी तूर आणल्यानंतर ती स्वच्छ करताना कर्मचारी.