सोलापूर : असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर तुझे फोटो व व्हिडीओ माझ्याकडे आहेत, ते सोशल मीडियावर व्हायरल करतो म्हणून वारंवार अत्याचार केल्याने पीडिता गरोदर राहिली. गर्भपात करण्यासाठी तिघांनी तोंडात गोळी टाकली. तुझा मोबाइल नंबर कॉलगर्ल म्हणून व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडित महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे.
हा प्रकार एक वर्षांपासून १७ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी लक्ष्मण तुम्मा, रमेश तुम्मा, नरेश तुम्मा या तिघांविरुद्ध भा. दं. वि. ३७६, ३७६ (२), ५०६,३४ अन्वये सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी महिला ही पतीशी काडीमोड झाल्याने आईसोबत काम करून उपजीविका भागवते. या दरम्यान, पीडिता घटस्फोटित असल्याने नमूद आरोपी १ ची तिच्यावर वाईट नजर पडली. त्याने एक वर्षापूर्वी घरात आई नसताना दुष्कृत्य केले. त्यानंतर तुझे अश्लील फोटो, व्हिडीओ माझ्याकडे आहेत, ते सोशल मीडियावर शेअर करतो म्हणून वारंवार अत्याचार केला.
यातून पीडिता चार महिन्यांची गरोदर राहिली. हा प्रकार समजताच १७ डिसेंबर रोजी घरी आई नसताना तिघे जण घरी आले आणि त्यांनी गर्भपात कर म्हणून जबरदस्तीने गर्भपाताची गोळी तोंडात टाकली. ती पीडितेने थुकून टाकली. आरडाओरड झाल्याने त्या दरम्यान पीडितेची आई आल्याने तिघांनी काढता पाय घेतला. जाताना त्यांनी तुझा मोबाइल नंबर कॉलगर्ल म्हणूृन सोशल मीडियावर प्रसिद्ध करतो म्हणून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी फिर्याद नोंदल्यानंतर सपोनि विभाग एकचे अधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी पीडितेची भेट घेऊन तिची व्यथा जाणून घेतली. पुढील तपास फौजदार चव्हाण करीत आहेत.
अन् अनोळखी नंबरहून कॉल येऊ लागले
तिघांनी काॅलगर्ल म्हणून मोबाइल नंबर पोस्ट करण्याची धमकी दिल्यानंतर ११ जानेवारीपासून अनोळखी नंबरहून फोन काॅल, व्हाॅट्सॲप मेसेस येऊ लागले. यामुळे मी त्रस्त झाले आहे. हे काम वरील तिघांनीच केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.