साेलापूर : सकल मराठा समाजाने माढा आणि साेलापूर लाेकसभा मतदारसंघांत सर्वांच्या सहमतीने एक उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी माळशिरसमध्ये गुरुवारी समाज बांधवांच्या जाहीर बैठकीचे आयाेजन केल्याची माहिती समन्वयक माउली पवार यांनी मंगळवारी दिली.
लाेकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदाेलनातील कार्यकर्त्यांची भूमिका ठरविण्यासाठी मनाेज जरांगे-पाटील यांनी २४ मार्च राेजी अंतरवाली सराटी येथे बैठकीचे आयाेजन केले हाेते. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात समाज बांधवांच्या सहमतीने एकच उमेदवार द्यावा. या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आरक्षण आंदाेलनातील नेत्यांनी काम करतील, असा निर्णय या बैठकीत झाला हाेता. त्यानुसार साेलापूर व माढ्यात एकच उमेदवार देण्यात येईल, असे सांगून पवार म्हणाले, माढा मतदारसंघासाठी एक साखर साखर कारखानदार, एक उद्याेजक, एक शिक्षण सम्राट, एक डाॅक्टर संपर्कात आहेत. माढा हा खुला मतदारसंघ असल्याने इच्छुकांची यादी वाढत जाईल. यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी माळशिरसमध्ये बैठक बाेलावली आहे. सर्वांच्या सहमतीने एकच उमेदवार देऊ.सनदी अधिकारी, नगरसेविका संपर्कात
साेलापूर हा राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून लढण्यासाठी एक माजी आदमार, एक सनदी अधिकारी, एका माजी नगरसेविकेसह अनेकजण इच्छुक आहेत. साेलापूरची बैठक शुक्रवारी हाेईल. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावे, ही समाजाची मागणी आहे. या मागणीला पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराला आम्ही उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊ, असेही पवार यांनी सांगितले.