'काँग्रेससाठी पुढचा काळ कठीण; कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे', सुशीलकुमार शिंदे यांनी दिला सल्ला
By Appasaheb.patil | Published: December 28, 2022 04:43 PM2022-12-28T16:43:00+5:302022-12-28T16:44:19+5:30
Sushilkumar Shinde : काँग्रेससाठी येणारा काळ कठीण असून कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीकुमार शिंदे यांनी सोलापुरात केले.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - महागाई, बेरोजगारी, जातिभेद या विरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेत कित्येक किलोमीटर मी ही चाललो आहे. मी जरी ऐंशी, ब्याऐंशी वर्षाचा असलो तरी मी म्हातारा झालो नाही मी अजून जवान आहे. उरलेला काळ सर्वसामान्य जनतेसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी काम करत काँग्रेसचा झेंडा पुढे घेऊन जाणार आहे, काँग्रेससाठी येणारा काळ कठीण असून कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीकुमार शिंदे यांनी सोलापुरात केले.
सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापना दिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापुर येथे "झेंडा वंदन" कार्यक्रम माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते यांच्या व मान्यवर नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीतीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सेवादल पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र ही देण्यात आले. भारत यात्रेत अडीच महिने चाललेल्याबद्दल इरफान शेख याचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात सुशीलकुमार शिंदे, आ. प्रणिती शिंदे यांनी जी जबाबदारी दिली त्या संधीचे सोने करून पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सोलापूर महानगपालिकेवर तिरंगा फड़कविणार असल्याचे सांगितले.
यावेळी उद्योगपती दत्ताआण्णा सुरवसे, माजी महापौर सुशीला आबुटे, अरिफ शेख, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी, शिवा बाटलीवाला, प्रविण निकाळजे, तौफीक हत्तुरे, विनोद भोसले, नगरसेविका अनुराधा काटकर, वैष्णवीताई करगुळे, परविन इनामदार, प्रदेश सचिव किसन मेकाले, गुरुजी प्रा.नरसिंह आसादे, मनीष गडदे, सुशील बंदपट्टे, शाहीन शेख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केले होते.