पंढरपूर - खेडभोसे येथील शेतकरी धनाजी विठ्ठल साळुंखे यांचा ट्रॅक्टर ऊस घेऊन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे जात होता. पटवर्धन कुरोली बंधाऱ्यावर आल्यानंतर दोन्ही ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस भरल्याने उतारावर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. त्यामुळे तो सरळ बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात पडला. ट्रॅक्टरचालक तब्बल दोन तास उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली अडकून होता. अपघात पाहून बंधाऱ्यावरून ये-जा करणारे वाहनचालक थांबले. पटवर्धन कुरोली, पिराची कुरोली परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नगरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते.
दैव बलवत्तर...
या घटनेनंतर नागरिकांनी नदीपात्रात उतरत ट्रॉलीमधील ऊस काढण्यास सुरुवात केली आणि बघता बघता दोन्ही ट्रेलरमधील ऊस बाजूला करून उसाखाली अडकलेला ट्रॅक्टर व चालकाला मोकळे केले. त्यानंतर पालखी मार्गाच्या कामावर असलेले क्रेन बोलावून ट्रॅक्टर व चालकाला तब्बल दोन तासानंतर बाहेर काढले. दोन तास खाली अडकूनही दैव बलवत्तर म्हणून सतीश कडाळे या चालकाचा जीव वाचला.
बंधाऱ्यावरून जड वाहतुकीला बंदी असूनही वाहतूक सुरू
पटवर्धन कुरोली येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून जड वाहातुकीला बंदी आहे. यापूर्वी अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. यापूर्वीही रस्ता अरुंद असल्याने वाहने नदीत पडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे ही जड वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिक, शेतकऱ्यांमधून करण्यात येत होती. मात्र पोलीस, पाटबंधारे प्रशासन दखल घेत नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बेसुमार वाळू, मुरूम, माती, ऊस, खडी, दगड अशा जड वाहतुकीमुळे बंधाऱ्याचेही नुकसान होत आहे.