सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवून पुन्हा लॉकडाऊन केल्यास सोलापुरातील व्यापार, उद्योग कोलमडून जाईल. कष्टकऱ्यांची रोजीरोटी जाईल. त्यामुळे प्रशासनाने असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दहावेळा विचार करावा. लॉकडाऊन करण्यापेक्षा कोरोनापासून वाचण्यासाठी नियम कडक करावेत, असे मत सोलापूरकर व्यापारी आणि नागरिकांनी व्यक्त केले.
लॉकडाऊनमुळे ‘जीडीपी’ने यंदा नीचांक गाठला आहे. यामुळे अर्थव्यवस्था ही खिळखिळी झाली आहे. सण- उत्सवामुळे अर्थव्यवस्था आता सुधारत आहे. पण पुन्हा जर लॉकडाऊन होणे म्हणजे पुन्हा लाखोंच्या रोजगारावर गदा आणण्यासारखे आहे. यामुळे लॉकडाऊन करण्यापेक्षा नियम कडक करावेत, गर्दी टाळण्यासाठी होणाऱ्या विविध कार्यक्रमांवर निर्बंध आणावेत पण नेहमी लॉकडाऊन सारखी टोकाची भूमिका न घेता पर्याय लक्षात घ्यावेत, असे मतही सामान्यांकडून व्यक्त केले जात आहे.
नियम कडक करा
आता लॉकडाऊन करणे हे सोयीचे नाही यामुळे व्यावसायिकांचे पूर्ण वर्ष वाया जाईल. आता व्यवहार सुरळीत होत आहेत. व्यवसाय सुरळीत झाल्यामुळेच अनेकांना पुन्हा रोजगार मिळत आहे. यामुळे लॉकडाऊन करण्यापेक्षा नियम कडक करावेत. एकत्रित होणाऱ्या कार्यक्रमांना बंदी घालावी. पण लॉकडाऊन करू नये.
- राजेंद्र हजारे, व्यावसायिक,
लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय
सध्या लॉकडाऊन झाले तर सर्व सामान्यांसह व्यापाऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहील. लॉकडाऊननंतर सध्या व्यापार सुरळीत होत आहे. यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाले तर अर्थव्यवस्था पूर्ण थांबून जाईल. शासनाने लॉकडाऊनपेक्षा नियम कडक करावेत सोबतच दुसरा पर्याय पहावा.
शंतनू बदामीकर, व्यावसायिक
नियम पाळा, बचाव करा!
लॉकडाऊन होणे हे देशासाठी चांगले नाही, तसेच रुग्ण वाढणे हेही चांगले संकेत नाहीत. सर्वांनी नियम पाळले तर लॉकडाऊन होणार नाही. काही व्यापारी नियम पाळत नाहीत. स्वत: कोरोनाबाबतचे नियम पाळत स्वत:चा बचाव करा आणि दुसऱ्यांनाही वाचवा. खूप मेहनतीनंतर अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येत आहे, लॉकडाऊन झाले तर रोजगारावर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
मयांक बिर्ला, नागरिक
रोजगार घटतील!
मागील लॉकडाऊनमधून बाहेर येण्यासाठी अजूनही प्रयत्न केले जात आहेत, त्यात दुसरा लाॅकडाऊन झाला तर हे अर्थव्यवस्थेला खूप अडचणीचे ठरणार आहे. भविष्यात मोठा फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो. सोबतच रोजगारही घटू शकतात, यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन करण्यापेक्षा नियम कडक करावेत.
घन:शाम चव्हाण, उद्योजक, व्यावसायिक