अंबादास वायदंडे
सुस्ते : आमच्या अनेक पिढ्यांपासून पोटासाठी लोहार हा व्यवसाय करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात भटकंती करीत आहोत़ पण वर्तमानकाळात रेडिमेड शेती अवजारे मिळत असल्याने आमचा पारंपरिक व्यवसाय संकटात आला आहे़ आज या गावात तर दोन दिवसानंतर दुसºयाच गावात असे किती दिवस भटकंती करायची, असा सवाल सचिन सोळंखे यांनी उपस्थित केला.
नाशिक तालुक्यातील आंबड या गावचे सचिन सोळंखे हे पत्नी, दोन मुली व एक वर्षाचा छोटा मुलगा घेऊन शेकडो किलोमीटर अंतर पार करून सुस्ते (ता. पंढरपूर) या गावी आले आहेत.
उन्हाळ्यानंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतात़ खरीप पेरणीसाठी विविध अवजारे दुरुस्ती करून घेणे किंवा नवीन घेण्याची शेतकºयांची धडपड सुरू असते़ त्यामुळे आम्हाला केवळ शेतकºयांकडून चार पैसे मिळतात़ मात्र यंदा पावसाळा लांबला परिणामी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत़ त्यामुळे यावर्षी शेतकºयांबरोबरच आमच्या व्यवसायावरही संकट निर्माण झाले आहे़ शेतकरी सुखी झाला तरच आम्ही सुखी, असे सचिन सोळंखे सांगत होते.
माझे गावीच केवळ सातवीपर्यंत शिक्षण झाले़ त्यानंतर पुढील शिक्षण परिस्थितीमुळे बाहेरगावी जाऊन करणे शक्य झाले नाही़ म्हणून शिक्षण सोडून पारंपरिक लोहार व्यवसाय करण्यास सुरुवात केली़ पूर्वी आई-वडिलांसोबत फिरताना चांगला व्यवसाय व्हायचा़ पण कालानुरुप शेतीतही आधुनिक यंत्राचा वापर वाढला़ रेडिमेड अवजारे शेतकरी वापरु लागले, त्यामुळे आमच्या व्यवसायावर संकट आले़
तीन मुले व पत्नीला घेऊन लोहार व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडून ७ ते ८ महिने बाहेरगावीच असतो़ गावाकडे वयोवृद्ध आई, वडील असतात. त्यांच्या दवाखान्याचा खर्चही आम्हालाच करावा लागतो़ वर्षातून केवळ चार महिने गावांकडे राहतो़ त्यामुळे मुलींच्या शिक्षणाची अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
लोहार व्यवसायात ७० टक्के महिलांचे योगदानगावोगावी फिरत असताना गावाच्या शेजारी रिकामी जागा दिसली की तेथेच पाल टाकून संसार थाटला जातो़ आम्ही पुरुष मंडळी केवळ लोखंड लाल झाल्यानंतर त्याला आकार देण्याचे काम करतो, पण या व्यवसायात ७० टक्के महिलांचेच योगदान आहे़ कारण ज्या गावात उतरलो त्या गावातून कोळसा गोळा करणे, भात्याला हवा मारणे, लोखंड लाल झाल्यानंतर त्यावर हातोड्याचे घाव मारणे, तयार केलेले अवजार पुन्हा गावात फिरून विकणे ही सर्व कामे महिलाच करतात़ सध्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे़ शिवाय घरोघरी गॅसचा वापर वाढला आहे़ त्यामुळे आता ग्रामीण भागातही सहजासहजी कोळसा मिळत नाही़ तरीही फिरून थोडा का होईना आणतोच, असे सीमा सोळंखे या सांगत होत्या़