पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी रात्री १२ वाजता जन्माष्टमीच्या सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. कृष्णाचेच रूप असलेल्या विठुरायाच्या डोक्याला तब्बल ११० फुटाचे आकर्षक पागोटे बांधण्यात आले होते तर हातात चांदीची काठी देण्यात आली होती़ मंदिरात शेकडो वर्षांपासून जन्माष्टमी साजरी करण्याची ही परंपरा आहे. त्या परंपरेनुसारच रविवारी रात्री हा उत्सव पार पडला. शिवाय विठ्ठलाला पारंपरिक अलंकारीक वेशभूषा परिधान करण्यात आली होती़
विठ्ठल सभामंडपात सुरुवातीला कृष्ण जन्माचे कीर्तन करण्यात आले. त्यानंतर रात्री १२ वाजता सभामंडपातील पाळण्यात ठेवलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर गुलाल आणि फुले उधळून जन्मसोहळा साजरा करण्यात आला. याचवेळी विठुरायाच्या पायावरही फुले आणि गुलाल उधळून देवाचा जन्माष्टमीचा सोहळा उत्साहात अन् भक्तीमय वातावरणात झाला. देवाच्या मस्तकी ११० हात लांबीचे वैशिष्ट्यपूर्ण पागोटे बांधण्यात आले. देवाच्या अंगावर किरमीजी रंगाची मखमली अंगी आणि कमरेला पितांबर नेसविल्यावर डोक्याभोवती शाल आणि हातात चांदीची काठी देण्यात आली.
विठ्ठलाच्या मूतीर्ला विविध प्रकारच्या फुलांच्या माळा आणि तुळशीहार घालण्यात आले होते. सुंठवडा, पेढे आणि फळांचा नैवेद्य दाखवून शेजारती करण्यात आली़ या जन्मसोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर आणि मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.