अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरात दिवसें दिवस विविध भागांत वाहतूक कोंडीचा प्रकार सातत्याने होत आहे. सर्वसामान्यांना अडचणीतून वावरत खरेदी करावीे लागत आहे. अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. कोंडी होताच रस्त्यावर वाहतुकीला अडथळे होतात. वाहने काढण्यावरून एकमेकांत वादविवाद हाेतात. काहीवेळी मुद्द्यावरून प्रसंग गुद्यावर ओढावतो. या वाहतूक कोंडीकडे स्थानिक वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे.
अक्कलकोट शहर हे तीर्थक्षेत्र म्हणून परिचित आहे. रोज शहरात स्वामी भक्तांची वर्दळ असते. तालुक्यात १३१ गावे असून, सर्वसामान्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. अक्कलकोट मुख्य बाजारपेठ असून, या बाजारपेठेत गर्दी असते. या वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडून सहा वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला गर्दीची ठिकाणे नेमून देण्यात आली आहेत. वाहतुकीची कोंडी ही सोडविण्यासाठी आणि नियोजन करण्याची जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यावर आहे. मात्र कोंडी झाल्यानंतर बराच वेळ ती सुटत नाही. यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होताना निदर्शनास येत आहे. अशा वेळी कोंडी फोडताना वादविवाद होतो. काही वेळा नागरिकांनाच ही कोंडी सोडवावी लागते.
--
या ठिकाणी होते वाहतुकीची कोंडी
एसटी स्टँड परिसरात काही लाेक मनमानीपणे वाहने लावतात. काही फळविक्रेत्यांच्या बेफिकिरीमुळे वाहतुकीची कोंडी होते. बुधवार पेठ येथील स्वामी समर्थ समाधी मठाजवळ रोडवर थाटलेली दुकाने व अरुंद रस्ते यामुळे वाहतूक कोंडी होते. ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिर अवैध वाहतुकीच्या गराड्यात अडकले आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर खरेदी-विक्रीच्या दुय्यम निबंधक कार्यालयासमोर दुचाकी लावलेल्या असतात. मुख्य रस्त्यावर पोलीस निरीक्षक बंडगर यांनी एकेरी वाहतूक सुरू केली होती. सध्याचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करताहेत. कोर्टाजवळ, जुन्या तहसील, स्टेट बँक, जवळ रस्त्याच्या कडेला वाहने लावल्याने वाहतुकीची कोंडी होते. स्वामी समर्थ मंदिर, अन्नछत्र परिसरात याहून काही वेगळे चित्र नाही.
--
कोंडी झाली की वाहतूक सुरळीत करणे हे वाहतूक पोलिसांचे कामच आहे. चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्यावर कारवाई करणे, नेमणुकीच्या पॉईंटवर थांबणे, आठवडा बाजार, एस. टी. स्टॅण्डवर नेमलेले पोलीस दिलेल्या वेळेत थांबणे सक्तीचे आहे. हे होत नसेल तर भेट देऊन जबाबदारांवर कारवाई करू.
- डॉ. संतोष गायकवाड, उपविभागीय, पोलीस अधिकारी
--
२२ अक्कलकोट
अक्कलकोट येथील सोमवार आठवडा बाजारजवळ आशा पद्धतीने दिवसभर वाहतूक कोंडी होते.