सोलापूर : मराठवाडा आणि शेजारील कर्नाटकातील जिल्ह्यांसाठी सोलापूर हे मोठे व्यापारी केंद्र आहे. या शहरात व्यापारी आणि ग्राहक खास गाडीने येऊन चादर, भुसार माल, कपडे, सोने - चांदीची दागिने खरेदी करतात; पण येताना त्यांची अडवणूक होते...याचा आम्हाला त्रास होत असल्याचे बाहेरील व्यापाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, देवदर्शनासाठी येणारे भाविकही आपल्या गावी परतताना सोलापूरला टाळून जातात. यामुळे येथील बाजारपेठेवर विपरीत परिणाम होतो.
काही व्यापारी आणि ग्राहकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, आता आम्ही सोलापुरात येऊन खरेदी करावी का? याचा विचार करतोय. गाडीतून येताना सर्व कागदपत्रे जवळ असली तरी आमची अडवणूक केली जाते; पण जर चुकून एखादे कागदपत्र नसले तर होणाºया त्रासाला मर्यादाच नसते. सकाळी सोलापुरात येऊन सायंकाळी गाडीत माल घेऊन जात असताना सर्वाधिक भीती वाटते. कारण गाडीमध्ये किंमती वस्तू असतात. या स्थितीत गाडी अडवली की, आमच्या शहरात पोहोचायला उशीर होतो. मार्गात असताना कुठे चोरांनी अडविले तर होणाºया नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गंगाधर बिराजदार या व्यापाराने सांगितले की, मी उमरग्याचा रहिवासी आहे, माझा कपड्याचा व्यवसाय आहे. मी खरेदीसाठी महिन्यातून एकदा माझ्या खासगी वाहनातून सोलापुरात येत असतो. येताना मला हैद्राबाद रोडवर अनेकवेळा अडवण्यात आले होते. कागदपत्रांची मागणी केली, लायसन्स विचारले, पीयूसी आहे का हे विचारले जाते. मी सोलापूरला येताना आता सर्व कागदपत्रे घेऊनच येत असतो; मात्र काही कारण सांगून वाहतूक शाखेचे पोलीस आम्हाला पावती करण्यास सांगतात. आम्ही धंदेवाईक माणसे आहोत, या झंजटमध्ये न पडता सरळ दंडाची पावती घेतो आणि निघून जातो. काही वेळेस दंडाची पावतीही दिली जात नाही. सोलापुरातून खरेदी करतो आणि पुन्हा आमच्या गावी निघून जातो. वाईट वाटते मात्र आम्ही सांगणार कोणाला? अशी खंत एका व्यापाºयाने व्यक्त केली.
सर्वकाही नियमात असतानाही आमच्याकडून दंड घेतला जातो. आमचा नाईलाज असतो, शेठजी आता तुमच्यापर्यंत आलो आहोत, आम्हाला विनाकारण दंड लावण्यात आला आहे. आता खरेदीमध्ये आम्हाला सूट द्या, नाहीतर पुढच्या वेळी आम्ही सोलापूरला येणार नाही. दुसरी बाजारपेठ शोधतो असे व्यापारी आम्हाला बोलतात अशी माहिती एका प्रसिद्ध कापड व्यापारी शंकरप्पा कलशेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
व्यापारावर विपरीत परिणाम- शेजारील कर्नाटक आणि महाराष्टÑभरातून देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताना मार्गात गाडी तपासणीच्या नावाखाली अडवणूक केली; पण हे भाविक जेव्हा परततात तेव्हा ते सोलापूरला बायपास करून आपल्या शहराकडे जातात. यामुळे येथील चादरीच्या व्यापारावर विपरीत परिणाम झाला आहे. शिवाय लॉजेस् आणि हॉटेल्सचा व्यवसायही कमी झाला आहे.