सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून हैदराबादकडे जाण्यासाठी नव्या कुरुल-कामती-मंद्रुप-तेरामैल- वळसंग- तांदूळवाडी या बाह्यवळण रस्त्याचे काम रखडल्याने सोलापूर शहरातील वाहतुकीवर मोठा ताण पडत आहे. दिवसा जड वाहनांना बंदी असल्याने शेकडो वाहने शहराबाहेर थांबल्याचे दृश्य पाहायला मिळते.
तीन वर्षांपूर्वी २६ फेब्रुवारी २०१६ रोजी जुळे सोलापुरातील एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर जिल्ह्यातील नव्या रस्त्यांच्या कामांची घोषणा केली होती. त्यातील काही कामांची कोनशीला बसविण्यात आली. मात्र अनेक कामे आजही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातीलच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ पासून पुढे जाणारा कुरुल- कामती- मंद्रुप- वळसंग- तांदूळवाडीमार्गे हैदराबाद महामार्गाला जोडणारा बाह्यवळण रस्ता आहे. घोषणेनंतर या रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही. विजयपूर-सोलापूर महामार्गावर तसेच सोलापूर-हैदराबाद महामार्गावर दिवसा असंख्य जड वाहने शहराबाहेर थांबलेली दिसून येतात. त्यांना रात्री उशिराने शहरात प्रवेश दिला जातो.
मध्यंतरी झालेल्या अपघातामुळे या जड वाहनांना सोलापूर शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे़ त्यांना तासंतास शहराबाहेर थांबावे लागते. वाहनचालकांची मोठी कुचंबणा होते. रात्रभर प्रवास करून आल्यानंतर त्यांना दिवसा विश्रांतीसाठी निवारा नसतो. रस्त्यावरच अंथरून टाकावे लागते़ जेवणखाणाची आबाळ होते. मोहोळपासून कुरुल-कामती-मंद्रुपमार्गे सोलापूर-विजापूर महामार्गाला जोडणारा हा रस्ता चारपदरी होणार आहे. त्यासाठी आधीच बहुतांश जमीन संपादित करण्यात आलेली आहे.
उर्वरित जमिनीपैकी शासकीय जमीन मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी तुलनेने कमी खर्च आहे़ तर सोलापूर-विजापूर महामार्गापासून औराद- वळसंग-तांदूळवाडीमार्गे हैदराबाद महामार्गाला जोडणारा नवा बाह्यवळण रस्ता दोनपदरी करण्याचे नियोजन आहे. यासाठी मान्यता, निधीची तरतूद आणि भूसंपादन या प्रक्रिया अद्याप सुरू नाहीत. त्यामुळे घोषणेनंतर तीन वर्षे उलटून गेली तरी बाह्यवळण रस्त्याला मुहूर्त लागणार कधी, असा प्रश्न वाहनधारक विचारत आहेत. ११० कि़ मी़ लांबीच्या या बाह्यवळण रस्त्यासाठी १४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा रस्ता सोलापूर-पुणे, सोलापूर-विजयपूर आणि सोलापूर-हैदराबाद या रस्त्यांना जोडणारा आहे. त्यामुळे सोलापूर शहरातून होणारी जड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून होेणे शक्य होणार आहे.
कुरुल-कामती-तेरामैल-औराद-वळसंग-तांदूळवाडी हा बाह्यवळण रस्ता जड वाहनांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. मी स्वत: गेल्या वर्षभरापासून रस्ते विकास महामंडळाकडे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. सोलापूर शहरातील वाहतुकीवर पडणारा ताण या बाह्यवळण रस्त्यामुळे कमी होण्यास मदत होईल.- संजय पोतदार,कंदलगाव, सामाजिक कार्यकर्ता