सोलापूर : कोविड-१९ अजून संपलेला नाही. त्यामुळे आपले कर्तव्य आहे की, जोपर्यंत यावर औषध येत नाही, तोपर्यंत खबरदारी घ्या. मोबाईलवर कानी पडणारी ही डायलर टोन आता सर्वांच्या अंगवळणी पडली आहे. काहीजण संतापून हेच किती दिवस ऐकविणार अशी तक्रार करताना दिसत होते; पण बुधवारी रात्री पुण्याहून बॉक्स घेऊन गाडी आली अन् चला आता लसीकरणाची वेळ झाली अशी चर्चा साेलापुरात सुरू झाली आहे.
१६ जानेवारी रोजी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यासाठी सरकारी व खासगी अशा ३८ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची पोर्टलवर नाेंद करण्यात आली हाेती. त्या अनुषंगाने या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यासाठी राज्य आराेग्य विभागातर्फे लस उपलब्ध करण्यात आली. आरोग्य उपसंचालकांच्या पुण्यातील औंध येथील कार्यालयातून सोलापूरसाठी ३४ हजार लस असलेले तीन बॉक्स पाठविण्यात आले.
पुण्याहून लसीचे बॉक्स घेऊन आरोग्य विभागाची व्हॅन रात्री आठ वाजता सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या जिल्हा आरोग्य विभागाच्या औषधालयासमोर दाखल झाली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, लसीकरण प्रमुख डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. जोगदंड, माध्यम अधिकारी रफिक शेख, फार्मासिस्ट प्रवीण सोळंकी यांनी स्वागत केले. नारळ वाढवून शीतसाखळी अबाधित ठेवण्यासाठी लसीचे बॉक्स २ ते ८ अंश तापमान असलेल्या शीतगृहात ठेवण्यात आले. मागणीप्रमाणे पुन्हा लसीचा पुरवठा होणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.
अन् गाडी अशी आली...
जिल्हा आरोग्य विभागातर्फे कोरोना लस आणण्यासाठी फॉर्मासिस्ट दिनेश नन्ना व चालक संजय भोसले हे बुधवारी पहाटे पुण्याला गेले होते. दुपारी अडीच वाजता सोलापूरचा नंबर आला. लस भरून परतताना सोलापूर कधी आले हे मला कळले नाही, असे भोसले यांनी सांगितले. ३४ वर्षांच्या नोकरीत अनेक कामे केली; पण सोलापूरकरांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असणारी ही लस आणताना मला आकाश ठेंगणे झाले. नन्ना यांनीही लस हाती पडल्यावर आनंदून गेल्याचे सांगितले.