सोलापूर : रेल्वे स्टेशनबरोबर सर्वच गाड्या चकाचक दिसण्यासाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, २८ जूनपर्यंत ही मोहीम युद्धपातळीवर चालणार असल्याचे सहायक विभागीय रेल्वे व्यवस्थापक के. मधुसूदन यांनी सांगितले. एक ट्रेन-एक स्टेशन अशी एका अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, एकूण ५४ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.रेल्वे बोर्डाचे चेअरमन अरविंद कुमार यांनी खास लेखी आदेश काढून तो सर्वच विभागातील सरव्यवस्थापकांना पाठवून दिला आहे. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी मध्य रेल्वेच्या सर्वच डीआरएमना लेखी पत्र पाठवून मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोलापूर विभागातील ९५ स्थानकांवर ही मोहीम राबविली जात आहे. गुलबर्गा, सोलापूर, दौंड, कोपरगाव आणि साईनगर स्थानकांवर खासगी संस्थांकडून स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे तर अन्य स्थानकांवरील स्वच्छता मोहिमेची जबाबदारी रेल्वेतील सफाई कामगारांवर सोपविण्यात आली आहे. विभागातील सर्वच रेल्वे स्थानक पाण्याने धुऊन घेण्यासाठी खास तंत्राचा अवलंब करण्यात येणार आहे. स्थानकावरील वेटिंग रुम, ओव्हरब्रीज, टॉयलेट, बाथरुम, शौचालयेही चकाचक करण्यावर भर देण्यात आला आहे.-----------------------डब्यांमध्येही स्वच्छता; नव्याने इलेक्ट्रिक फिटिंग्जजनरल डब्यांपासून ते वातानुकूलित डब्यांचे वॉशिंग होणार असून, त्यानंतर वातानुकूलित डब्यांमध्ये नवे बेडसीट, ब्लँकेट पुरविण्यात येणार आहे. काही केमिकल्सचा वापर करून डब्यांमधील काही डाग पुसण्याचा प्रयत्नही मोहिमेतील सफाई कामगार करणार आहेत. सर्वच डब्यांमधील शौचालयेही स्वच्छ होणार असल्याने प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. --------------------प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न असतोच. प्रवाशांकडून केरकचरा, पाण्याच्या बाटल्या कुठेही टाकल्या जातात. त्यांनीही थोडी काळजी घ्यावी. प्रवाशांनी सहकार्य केले तर स्वच्छता कायमस्वरूपी राहणार आहे. - आय. भास्कर रावसहायक वाणिज्य व्यवस्थापक
रेल्वे स्टेशन होणार चकाचक !
By admin | Published: June 22, 2014 12:20 AM