बाळाच्या आईची आर्त हाक साहेबांनी ऐकली, चिमुकल्याला घेऊन जाण्यासाठी चक्क रेल्वेही थांबली
By appasaheb.patil | Published: May 17, 2020 05:10 PM2020-05-17T17:10:55+5:302020-05-17T20:59:48+5:30
सोलापुरात 'पत्रकारिता परमोधर्म:'चा नवा अध्याय; सोलापूर रेल्वे स्थानकावरील घटना, परप्रातीयांना घेऊन जाणारी श्रमिक ट्रेन सोलापुरातून रवाना
सोलापूर : लॉकडाऊनमुळे आपल्या मुळगावी न जाता सोलापुरातच अडकून पडलेल्या ग्वाल्हेर (राज्य - मध्य प्रदेश) येथील ११४२ परप्रातीयांना घेऊन जाणारी विशेष ट्रेन रविवारी दुपारी दोनच्या सुमारास निघाली़ मात्र एका महिलेला दीड वर्षाच्या बाळाला घेऊन रेल्वे स्थानकावर यायला उशिरा झाला. यावेळी रेल्वे रूळावरून महिलेला धावत येताना पाहून सोलापूर 'लोकमत' चे फोटोग्राफर यशवंत सादूल यांनी मदतीचा हात देत त्या महिलेला बाळासह रेल्वे डब्यात पोहोचविण्यास मदत केली. याचवेळी रेल्वे प्रशासनानेही माणूसकी दाखवित काही काळ रेल्वे थांबविली.
कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला़ त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद करण्यात आलं़ सर्वकाही बंद झाल्याने राज्यातील परप्रातीयांचे मोठे नुकसान झाले़ काम नसल्यानं परप्रातीय लोक आपल्या मुळगावी जाण्यासाठी धडपड करू लागले़ मात्र खासगी वाहनांसह सर्वच वाहने बंद असल्याने त्यांची मोठी अडचण झाली़ अशातच काही मजूरांनी पायी चालत आपलं गाव गाठणं पसंत केले. पायी चालत जाणाºयांची संख्या जास्त होऊ लागल्यानं महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या मदतीने राज्यात लॉकडाऊनमुळे अडकून बसलेल्या नागरिकांना त्यांच्या मुळगावी पोहोचविण्यासाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाने श्रमिक विशेष ट्रेन सुरू केल्या.
या अनुषंगाने रविवारी सोलापूर रेल्वे स्थानकावरून ग्वाल्हेर (राज्य - मध्यप्रदेश) कडे विशेष रेल्वे गाडी मार्गस्थ होणार होती, सकाळी १० वाजल्यापासूनच यासाठी नोंदणीकृत परप्रातीयांनी मोठी गर्दी केली होती. रेल्वे स्थानकावर पोहोचताच प्रवाशांची आरोग्य तपासणी करून रेल्वे डब्यात बसविण्यात येत होते.
दरम्यान, दुपारी दोनच्या सुमारा समान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवणार अन रेल्वे सुटणार त्याचे चित्रण आणि वार्तांकन करण्यासठी सगळे सज्ज होते. अचानक इंद्रधनू जवळील रेल्वे पुलाखालून दोन महिला धावत स्टेशनच्या दिशेने येताना दिसल्या. माझ्यासह काही छायाचित्रकरांनी त्यांची छायाचित्रे घेण्याचा प्रयत्न केला. जसजसे त्या जवळ येत होते तसे त्यांची रेल्वे पकडण्यासाठीची धडपड दिसून येत होती .रेल्वे रुळावरून येताना एका माऊलीचा तोल गेला आणि पदराखाली तिच्या हातात असलेल्या बाळाचे पाय दिसले. तो क्षण पाहताच मी रेल्वेच्या ड्रायव्हर आणि प्रशासनाला त्या बाईकडे दाखवत गाडी थांबवण्यासाठी विनंती केली. त्यांनीही त्याला प्रतिसाद देत लवकर येण्याचा इशारा केला. त्यासोबत मी पळत जाऊन त्या माऊलीच्या हातातील बाळाला माझ्याकडे देण्याची विनंती केली. त्यांनी तात्काळ बाळाला माझ्याकडे दिले. मी त्यांना त्यांचा डबा विचारले असता त्यांनी सोळा असे सांगितले. त्यांच्यासोबत आणखी तिघे कुटुंबिय येत होते. ते सर्वजण भामंबावलेले होते. धावत पळत जाऊन डब्यापर्यंत पोचणे एकच लक्ष होते. बाळाला घेऊन त्यांच्या डब्यापर्यंत पोहचविण्यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी ही गरजेचे होते. त्याशिवाय डब्यात प्रवेश मिळत नव्हता, त्यांना थांबवून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या डब्यापर्यंत पोचायाला बारा ते पंधरा मिनिटे लागले... कॅमेऱ्यातून रेल्वे सोडण्याचे चित्रण करण्याऐवजी एका कटुंबाला त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी केलेल्या मदतीने धन्य धन्य झाल्याची भावना झाली. सर्व प्रवासी हे एस - टी बसने आले, मात्र हे प्रजापती कुटुंबिय हे आमराई परिसरात लक्ष्मी पेठ येथे राहतात, संचारबंदी सुरू झाले आणि गाडी सुटायची वेळ होत आल्याने रेल्वे रुळावरूनच स्टेशन गाठायचे ठरवुन स्टेशनकडे निघाले, पण तोपर्यंत उशीर झाला ,एवढ्या दिवसानंतर गावाकडे जायला मिळणार पण गाडी चुकली तर या भीतीने ते पळतच येत होते, माझ्या हातात दिलेल्या बाळाला तिच्या आईच्या हाती सोपवून बाळाचे नाव विचारले असता त्यांनी सृष्टी अखिलेश प्रजापती असे सांगितले. अवघ्या दीड महिन्याचे ते बाळ...रणरणत्या उन्हात आग्रा या आपल्या गावी जाण्याची त्यांची ओढ, डब्यात बसल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद सर्वकाही सांगून गेले, रेल्वेचा हॉर्न वाजला आणि कृतज्ञ भावनेने नमस्कार करून निरोप घेतला आणि गाडी ग्वाल्हेरकडे रवाना झाली.