शीतलकुमार कांबळे
सोलापूर : शहरात सुमारे दीड हजार केशकर्तनालये आहेत. बहुतांश केशकर्तनालये ही नाभिक समाजातील लोकांचीच आहेत. प्रत्येकाचे कुणाशी तरी नाते असतेच. या नात्यातील प्रेमापोटी कोणतेही शुल्क न घेता नव्याने केशकर्तन शिकू इच्छिणाºयास ही कला शिकविली जाते. सुरुवातीला केशकर्तनाच्या दुकानात मदत करण्याचे काम शिकाऊ कलाकार करत असतो. जसजसा अनुभव येईल तशी त्याच्यावर दुकानातील कामाची जबाबदारी दिली जाते. या जबाबदारीतूनच केशकर्तन करणारा नवा कलाकार घडतो.
केशकर्तनाचे प्रशिक्षण हे दोन प्रकारे दिले जाते. एक पारंपरिक तर दुसरे व्यावसायिक प्रशिक्षण. पारंपरिक प्रकारात नव्याने केशकर्तनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थ्याला सुरुवातीला दुकान स्वच्छ करणे, दाढीचे साबण, ब्रश स्वच्छ करणे आदी कामे करावी लागतात. त्यानंतर दाढी व केस कापण्याचे प्रशिक्षण दिले जाते. केसांना वळण लावणे, रंग लावणे, फेशियल करणे, चंदन लावणे आदी कामे शिकवली जातात. प्रशिक्षणार्थी यात पारंगत झाला की त्याच्यावर दुकान सांभाळायची देखील जबाबदारी दिली जाते.
प्रशिक्षणाच्या दुसºया प्रकारात प्रशिक्षणार्थ्यास व्यावसायिक प्रशिक्षण देणे असा आहे. ज्यांची दुकाने शहरात आहेत, ते दुकानदार त्यांचा मुलगा किंवा दुकानात काम करणºया कलाकारास स्वखर्चाने प्रशिक्षण घेण्यास मुंबई, बंगळुरू येथे पाठवितात. केस कापण्यापासून त्याची ठेवण खशी करायची याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण त्याला दिले जाते. सोलापुरात आल्यानंतर त्या प्रशिक्षणाचा उपयोग करून वेगवेळ्या पद्धतीने केस कापले जातात. मोठ्या शहरात प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर त्या कलाकाराची माऊथ पब्लिसिटी होऊन दूरचे ग्राहक देखील केस कापण्यासाठी येतात, असे एका दुकानदाराने ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली सुरू...- सध्या सोलापुरात पारंपरिक पद्धतीने केस कापणे व इतर प्रशिक्षण पारंपरिक पद्धतीने दिले जाते. व्यावसायिक पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी एकही प्रशिक्षण केंद्र सोलापुरात नाही. मुंबई, बंगळुरूसारख्या शहरात व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या कलाकारांकडून सोलापुरात व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचे श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थेचे सचिव अभयकुमार कांती यांनी सांगितले. या केंद्रामुळे प्रशिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही.
फक्त दाढी-कटिंग करून दुकान चालविता येणार नाही. त्यासोबत इतरही सुविधा द्याव्या लागतात. याचाच विचार करून या क्षेत्रातील बदलांना सामोरे जाण्यासाठी आमचे काही बांधव बंगळुरू, मुंबई, हैदराबाद येथे जाऊन प्रशिक्षण घेत आहेत. याचा फायदा येथील कलाकारांना तर होतोच सोबत ग्राहकांनाही चांगली व अत्याधुनिक सेवा देता येते. - अभयकुमार कांतीसचिव, श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्था.