आप्पासाहेब पाटील
सोलापूर : भारतीय रेल्वे मंत्रालयाने लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी आता रेल्वेचा डब्बा किंवा संपूर्ण ट्रेनच बुक करण्याची सुविधा निर्माण करून दिली आहे. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने रेल्वेनं टाकलेल्या या नव्या योजनेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. जेवढे प्रवासाचे भाडे तेवढेच वऱ्हाडासाठीचे भाडे आकारण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यातच खासगी बस, वाहनधारकांनी प्रवासाचे भाडे वाढविले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लग्नकार्यातील मंडळींना रेल्वेने दिलासा देणारा हा निर्णय घेतला आहे. लग्नाची वरात नेण्यासाठी वधू-वरांच्या पालकांकडून एसटी किंवा खासगी बस बुक केली जात होती. मात्र, आता वधू-वरांकडील मंडळी आता रेल्वे बुक करू लागले आहेत. लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी रेल्वेचा डबा बुक करायचा असल्यास तो आता करणे अगदी सोपे झाले असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले.
-------------
किती पैसे जमा करावे लागतील?
- एका कोचसाठी - ५० हजार रुपये
- १८ डब्याच्या ट्रेनसाठी - ९ लाख रुपये
- हॉल्टिंग चार्ज - जेवढा वेळ गाडी थांबणार आहे त्यानुसार असेल.
-------------
नियम आणि अटी जाणून घ्या
तुम्ही जी ट्रेन बुक कराल तिला १८ ते २४ डबे असतील. एका डब्यात ७२ सीट उपलब्ध आहेत. ट्रेनमध्ये तीन एसएलआर कोच आवश्यक आहेत. तुम्ही कमी डबे घेतले तरीही तुम्हाला १८ डब्यांच्या बरोबरीने अनामत रक्कम द्यावी लागेल. यासाठी तुम्हाला १ ते ६ महिने अगोदर बुकिंग करावे लागेल. तुम्ही बुकिंगच्या तारखेच्या दोन दिवस आधी बुकिंग रद्द करू शकता. ट्रेन कोणत्याही स्थानकावर १० मिनिटांपेक्षा जास्त थांबणार नाही.
----------
असे बुकिंग करू शकता
- - तुम्हालाही संपूर्ण रेल्वे किंवा कोच बुक करायचा असेल तर तुम्ही आयआरटीसी वेबसाइटवर जा.
- - आता एफटीआर सेवेवर जा.
- - आयडी पासवर्ड वापरून त्याला लॉग इन करा.
- - येथे विचारलेली सर्व माहिती भरा.
- - तारीख आणि इतर माहिती भरल्यानंतर ऑनलाइन पेमेंट करा.
------------
स्थानकावर गाडी थांबवायची असेल तर ज्यादा पैसे मोजा
- रेल्वेचा डब्बा अथवा संपूर्ण रेल्वे बुक केल्यास ही गाडी एका रेल्वे स्थानकावर ७ मिनिटांच्या वर थांबणार नाही असे नियोजन रेल्वे विभागाकडून केले जाते, तर संपूर्ण रेल्वे बुक केल्यास ती गाडी केवळ काही विशिष्ट स्थानकावरच थांबविली जाते. अथवा ती तिच्या नियोजित ठिकाणीच थांबते. जर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार गाडी थांबवायची असेल तर त्यासाठी ज्यादा पैसे मोजावे लागतील.
--------
लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी आता रेल्वेचा एक कोच किंवा संपूर्ण रेल्वे बुक करता येते. त्यासाठीचे भाडे हे एकूण प्रवासावर अवलंबून आहे. उत्पन्नवाढीसाठी रेल्वेच्या या नव्या योजनेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त लग्नाच्या वऱ्हाडासाठी रेल्वे बुक व्हावी यासाठी प्रचार, प्रसार व प्रसिद्धी करण्यात येत आहे.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर मंडल