सोलापूर : फुटपाथवरील अतिक्रमण ही मोठी समस्या आहे. फुटपाथ बनला की लगेच त्यावर काही दिवसांनी अतिक्रमण होते. यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून जाण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे दररोज शहरात छोटे-मोठे अपघात होत आहेत. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून जावे लागत आहे. शिवाय पादचारी फुटपाथवरून गेल्यास अतिक्रमण केलेल्यांकडून नागरिकांना अपमानास्पद बोलणे ऐकावे लागत असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे.
पालिकेने शेकडोवेळा अतिक्रमणाची कारवाई केली तरी कारवाईनंतर काही तासांतच तिथे पुन्हा अतिक्रमण होतच असते. असा हा खेळ वर्षानुवर्षे सुरू आहे. शहरातील प्रमुख भागात काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने रस्त्यावर गाड्या लावाव्या लागतात. अनेक ठिकाणी पार्किंगच्या जागेवर दुकाने थाटण्यात आलेली आहेत. यामुळे वाहने रस्त्यावर लागतात. तसेच रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. पण, पार्किंगमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही, असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
फुटपाथवर गाड्या लावल्या जातात. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालत जावे लागते. यामुळे फुटपाथवर व्यापाऱ्यांना बसण्याची परवानगी देऊ नये. मोकाट प्राण्यांचा वावरही वाढल्यामुळे अपघात होत आहेत. सोबत आसरा येथे उसाच्या गाड्यांची वर्दळ वाढली आहे. यामुळे अपघाताची शक्यता जास्त आहे.
- श्याम पाटील, नागरिक
सोलापुरातील स्मार्ट सिटीमध्ये फुटपाथचे प्लॅनिंग केलेले नाही. यामुळे स्मार्ट सिटीच्या नावाखाली सोलापूरकरांची गोड चेष्टा केली जात आहे. रस्ता जर ९ मीटरपेक्षा मोठा असेल तर जवळपास ६ फुटांचा फुटपाथ असणे बंधनकारक आहे. पण, हा नियम पाळला जात नाही.
- मिलिंद भोसले, इंजिनीअर ,नागरिक
कंबर तलाव फुटपाथवर मोठे अतिक्रमण
सध्या होटगी रोड परिसरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिवाय सध्या उसाची वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. शिवाय छत्रपती धर्मवीर संभाजी तलाव येथील फुटपाथवर फळ विक्रेत्यांची मोठी गर्दी असते. शिवाय ते येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना ओरडून बोलावत असतात, यामुळे वाहनचालकांचे दुर्लक्ष होऊन अपघात होण्याची शक्यता जास्त असते.