सोलापूर : कोरोना महामारीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या विविध मार्गांवरील एसटीच्या बंद असलेल्या फेऱ्या सुरू करण्यात येत आहे. सोलापूर आगारातून जवळपास ९० टक्के फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित फेऱ्या पुढील काही दिवसातच सुरू होणार आहे, असे एसटी अधिकाऱ्यांचे मत आहे.
राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागाच्या वतीने बसफेऱ्या सुरू केल्यानंतर सुरुवातील प्रवाशांकडून खूप अल्पप्रतिसाद मिळत होता, पण कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला. यामुळे अनेक गावांच्या बंद असलेल्या फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येत आहे. सोबत शाळा सुरू होत असल्यामुळे ज्या मार्गावर बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी असते त्या मार्गावर गाड्या सुरू करण्यात येत आहे.
कोरोनाच्या अगोदर सोलापूर आगारातून जवळपास पाचशे फेऱ्या सुरू होते. आता जवळपास ४०० गाड्यांच्या फेऱ्या सुरू करण्यात आलेले आहेत. यामुळे उर्वरित मार्गावर गाड्या सुरू करण्यासाठी आगारांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पण अनेक आगारातील गाड्या मुंबईकरांच्या सेवेसाठी गेल्यामुळे अनेक मार्ग हे बंद ठेवावे लागत आहे.
ज्या मार्गावर प्रवाश्यांकडून गाड्या सुरू करण्याची मागणी होते त्या मार्गावर आम्ही गाड्या सुरू करतो. सध्या ९० टक्के गाड्या सुरू झालेल्या आहेत. पुढील काही दिवसांत पुणे मार्गावरील १०० टक्के फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे.
- प्रमोद शिंदे, स्थानकप्रमुख
तीन लाखांनी उत्पन्न घटले
सध्या सोलापूर आगारातील बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने न धावू लागल्यामुळे आगाराचे दिवसाकाठचे उत्पन्न दोन ते तीन लाखांनी कमी होत आहे. लॉकडाऊनपूर्वी प्रत्येक दिवशी जवळपास पंधरा लाखांचे उत्पन्न एसटीला मिळत होते. आता जवळपास ११ ते १२ लाखांचे उत्पन्न एसटीला मिळत आहे.
या मार्गावर सर्वाधिक प्रवासी
सोलापूर आगारातून पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद या मार्गासाठी जास्त प्रवासी असतात; पण या सर्व मार्गांवर एसटी गाड्यांच्या फेऱ्या पूर्ण क्षमतेने सोडण्यात आलेले नाहीत. यामुळे अनेकवेळा प्रवाशांना स्थानकात ताटकळत थांबावे लागत आहे. सोबतच कुरूल, अंकोली, येवती या मार्गावरील मुक्कामी गाड्या बंद केल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहेत.
पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावात दिवसातून तीनफेऱ्या येतात, पण त्या गाड्यांचा वेळ निश्चित नसल्यामुळे अनेकवेळा आम्हाला एसटीची वाट पाहण्याशिवाय पर्याय राहत नाही.
- कुमार नरखेडे, प्रवासी
-------------
लॉकडाऊनमुळे आचेगावमधील फेऱ्या बंद करण्यात आले. पण लॉकडाऊननंतरही या मार्गावरील गाड्या सुरू करण्यात आलेले नाहीत. यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना वळसंगपर्यंत येऊन तेथून प्रवास करावा लागत आहे.
- अमोल ननवरे, प्रवासी