सोलापूर : महापालिकेचे कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोरच एस्कॉर्ट वसुलीत भ्रष्टाचार करत असल्याचे उघडकीस आल्याने झालेल्या चौकशी अहवालावर आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सर्व जकात नाक्यांवरील कामगारांच्या बदल्या करण्याचा आदेश शनिवारी दिला आहे. विजापूर नाका येथे महापालिकेचे कर्मचारी शहरातून बाहेर जाणाऱ्या मालवाहतूक गाड्यांकडून १७0 रूपयाच्या एस्कॉर्ट ऐवजी २00 रूपये घेत होते. ही बाब नगरसेवक नागेश ताकमोगे यांनी बुधवारी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ विजापूर नाक्यावर जाऊन पैशाची तपासणी केली. पंचनामा करून अहवाल तयार करण्यात आला. यावेळी विजापूर रोड एस्कॉर्ट नाक्यावर व्ही. एन. वडतिले, पी. एम. मुस्तापुरे (कारकून), व्ही. एस. सामलेटी (शिपाई) हे कर्मचारी कार्यरत होते. प्रभारी आयातकर अधीक्षक एम. एस. याटकर आणि व्ही. बी. किरनळ्ळीकर यांनी काऊंटरवरील पैसे आणि रजिस्टरची तपासणी केली होती. हा अहवाल शनिवारी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे सादर करण्यात आला होता. आयुक्त या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करणार की आणखी काय करणार याकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र त्यांनी तडकाफडकी सर्वच कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश दिला.