सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील दोन महत्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश मंगळवारी प्राप्त झाले. या आदेशात उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज येथील बसवराज शिवपुजे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर येथे तर उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा येथील राजश्री पाटील यांची पोलीस उपअधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
आता नव्याने विक्रांत हिम्मत गायकवाड हे उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना शहरातून उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा येथे रूजू होणार आहेत. अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांना ५ जुलै २०२३ रोजी कार्यमुक्त करावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. गृहविभागाने मंगळवारी राज्यातील पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गातील अधिकारयांच्या बदल्या केल्या. यात १८ अधिकार्यांचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील महत्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र गृहविभागाने चालू ठेवले आहे. दररोज एक एक आदेश बदल्याचे प्राप्त होत आहेत. शिवाय जिल्हास्तरावरही प्रशासकीय बदल्या व विनंती बदल्या होत आहेत.