विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत देश व राज्य पातळीवरील अनेक विक्रम केले आहेत. अनेक पुरस्कारांनी हा कारखाना सन्मानित झालेला आहे. सहकारी तत्त्वावर उभारलेल्या या कारखान्याचे रूपांतर मल्टिस्टेट सहकारी संस्थेत करण्याचे प्रयत्न दोन-तीन वर्षांपासून चालू होते. संचालक मंडळाने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालय, कृषी व सहकार विभागाने ५ नोव्हेंबर २०२० रोजी या कारखान्याची नोंद बहुराज्यीय (मल्टिस्टेट) सहकारी संस्था कायदा २००२ अंतर्गत झाली असल्याचे प्रमाणपत्र कारखान्यास दिले आहे. एमएसएससी/सीआर/१३०१/२०२० असा प्रमाणपत्राचा नंबर आहे.
आता या बहुराज्यीय सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्रात सध्या माढा तालुक्यातील ११८ व विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील नऊ अशा एकूण १२७ गावांचा समावेश असणार आहे. यापुढे या कारखान्याचा कारभार बहुराज्यीय सहकारी संस्थेच्या नियमानुसार चालणार आहे. त्यामुळे संस्थेच्या संचालक मंडळास जादा अधिकार प्राप्त होणार आहेत. युती सरकारच्या काळात राज्यातील साखर कारखान्यावर तज्ज्ञ संचालक नेमण्याचा निर्णय झाल्यानंतर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाने राज्य शासनाचे भाग भांडवल परत केले होते.