पोलीस सूत्रानुसार महाराष्ट्रात बंदी असलेला पान मसाला, सुगंधित तंबाखूजन्य गुटखा चडचण (जि. विजापूर, राज्य कर्नाटक) येथून पंढरपूरमार्गे अकलूजकडे विक्रीसाठी नेत असल्याची खबर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी अहिल्यादेवी पुलाजवळ सापळा रचला. सोमवारी रात्री साडेसातच्यासुमारास (एमएच ४५ ए एफ ४९२२) हे वाहन हे संशयितरित्या आढळून आले. या वाहनाची तपासणी केली असता, यामध्ये ६ लाख रुपयांचा पानमसाला व ५० हजार रुपयांची सुगंधित तंबाखू आढळून आली.
चौकशीदरम्यान सूरज शंकर गवळी (वय २१, रा. शेळगाव (आर), ता. बार्शी, सध्या रा. अकलूज, ता माळशिरस) व सत्यवान राजाराम शिंदे (३२, रा. महाळुंग, ता. माळशिरस) यांनी श्रीशैल्य कलमानी (रा. चडचण) यांच्याकडून पान मसाला व सुगंधी तंबाखू खरेदी केली. तो माल रवी अशोक रणवरे (रा. अकलूज) यांच्या (एमएच ४५ ए एफ ४९२२) वाहनामध्ये गुटखा व्यावसायिक गणेश सदाशिव भोसले (रा. अकलूज) यांच्या सांगण्यावरून घेऊन येत होते. यामुळे पाचजणांविरुध्द पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदल्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी सांगितले.
फोटो : तंबाखूजन्य पदार्थ असलेल्या वाहनाची तपासणी करताना पोलीस निरीक्षक अरुण पवार. (फोटो : सचिन कांबळे)