सोलापूर : महापालिकेच्या परिवहन विभागाचा आस्थापना खर्च उत्पन्नापेक्षा अधिक आहे. तो कमी करण्यासाठी या विभागातील जादा पगारवाल्या कर्मचाºयांना महापालिकेत सामावून घ्यावे. त्यांच्या जागी मनपातील कंत्राटी कर्मचाºयांना परिवहन विभागात पाठवावे, असे पत्र आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना देण्यात येणार असल्याचे सभापती तुकाराम मस्के यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मस्के म्हणाले, दहा महिन्यांपूर्वी एसएमटीच्या १७ बस धावत होत्या. व्यवस्थापक अशोक मल्लाव आणि आम्ही प्रयत्न केल्यामुळे आता ५५ बस धावत आहेत. दररोज दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. आस्थापना खर्च तीन लाखांपेक्षा जास्त आहे. तो कमी करायचा असेल तर या विभागातील जादा पगारवाले कर्मचारी महापालिकेत पाठवायला हवेत. काही जुने व्यवस्थित काम करीत नाहीत. त्याचा फटका प्रामाणिक कर्मचाºयांना बसतो. पुढील दिवसांत आणखी २५ बस रस्त्यांवर धावाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या बसच्या दुरुस्तीसाठी महापालिका आयुक्त डॉ. ढाकणे यांनी काही निधी देऊ असे आश्वासन दिले आहे. एकदा ८० बस धावू लागल्या तर उत्पन्नही वाढेल. पण आस्थापना खर्च वाढला तर या विभागात पुन्हा अडचण होईल.
कामगारांचा संपाचा निर्णय स्थगित
- - परिवहन विभागातील कर्मचाºयांना डिसेंबर महिन्यातील पगार अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी संप करण्याचा निर्णय घेतला होता. गड्डायात्रेच्या काळात संप केल्यास शहरातील नागरिकांना त्रास होईल. महापालिकेकडून लवकरात लवकर निधी मिळवू आणि पगाराचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन सभापती तुकाराम मस्के, व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी दिले. त्यामुळे कामगारांनी संपाचा निर्णय आठ दिवसांसाठी स्थगित केला आहे.
दिव्यांग विभागाकडून ८२ लाख रुपये येणे
- - सभापती मस्के म्हणाले, एसएमटीच्या बसमधून मुलींना मोफत प्रवासाची सोय आहे. त्यापोटी महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून दरवर्षी एक कोटी रुपये एसएमटीला दिले जातात. त्याचप्रमाणे अंध आणि अपंग बांधवांनाही मोफत प्रवासाची सोय आहे. अंध आणि अपंग विभागाकडे ८२ लाख रुपयांचे येणे आहे. हा निधी आणल्यानंतर कामगारांचा प्रश्न निकाली काढण्यास मदत होईल. तो लवकरात लवकर मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.