सोलापूर : वैद्यकीय व्यवसायाकरिता शैक्षणिक पात्रता नसताना बेकायदेशीरपणे डॉक्टर उपाधी लावून सर्वसामान्य नागरिक व प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापुरातील एका बोगस डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार देवेद्रनाथ रॉय (वय ४२, रा. गंगाधर नगर, किसान संकुलच्याशेजारी, एम.आय.डी.सी. सोलापूर) असे बोगस डॉक्टराचे नाव आहे.
याबाबत सोलापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवकांची श्रीनिवास चिप्पा (वय ४७, रा. दाजी पेठ, चिप्पा रेसिडेन्सी, सोलापूर) यानी फिर्याद दिली आहे. याबाबत पेालिसांनी सांगितले की, तुषार रॉय हा कुमठा नाका, हुडको कॉलनी येथे बकुल क्लिनिक नावाचा दवाखाना चालवित होता. डॉक्टर नसताना सर्वसामान्यांना डॉक्टर असे सांगून उपचार करीत असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागास मिळाली. या माहितीच्या आधारे आरोग्य विभागाचे आधिकारी हे पथकासह बकुल क्लिनिक दवाखाना येथे तपासणी केली.
याचवेळी तुषार राॅय हे महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीसनर्स ॲक्ट १९६१ नुसार त्यांची वैद्यकीय व्यवसायाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता नसल्याचे व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक नसल्याचे आढळून आले. याशिवाय शैक्षणिक पात्रता नसताना देखील बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसायिक प्रॅक्टीस करून ते डॉक्टर उपाधी लावून सर्वसामान्य रूग्णावर उपचार करीत असल्याचे आढळून आले. सर्वसामान्य रूग्ण व महापालिका प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तुषार रॉय विरोधात सदर बझार पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पेालिस निरीक्षक कुलकर्णी हे करीत आहेत.