सोलापूर : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या सोलापुरात कोरोनावर उपचार घेण्याकरिता पश्चिम महाराष्ट्रातील रुग्ण मोठ्या संख्येने सोलापुरात दाखल होत आहेत. सध्या सोलापुरात ८७८५ रुग्ण आहेत. यातील एकूण रुग्णांपैकी २५ टक्के रुग्ण हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
पुणे, सातारा, सांगली, इंदापूर तसेच कोल्हापूर या परिसरातून मोठ्या संख्येने रुग्ण सोलापुरात उपचाराकरिता येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रासोबत मराठवाड्यातून देखील मोठ्या संख्येने रुग्ण उपचाराकरिता सोलापूरकडे धाव घेत आहेत. यासोबत विजयपूर, कलबुर्गी, लातूर, बीड, उस्मानाबाद, कराड यांसारख्या ठिकाणाहून देखील रुग्ण उपचाराकरिता सोलापुरात येत आहेत.
पुणे परिसरात कोरोनाचा कहर सुरू असून उपचाराकरिता तिथे बेडची संख्या अपुरी पडत आहे. यामुळे पुण्यातून देखील मोठ्या संख्येने रुग्ण सोलापुरात येत आहेत. इतर ठिकाणी देखील तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये जवळपास ४०० बेड कोरोना उपचाराकरिता राखीव आहेत.
यापुढे देखील इमर्जन्सीसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचे नियोजन आम्ही आजच करून ठेवले आहे. सोलापुरात कायमस्वरूपी चारशे बेड उपचाराकरिता राखीव असतील, अशी माहिती देखील जिल्हाधिकारी शंभरकर यांनी ‘लोकमत’ला दिली.