सांगोला : तालुक्यात कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मागील वर्षभरात ४७ हजार ५९ नागरिकांनी चाचणी केली असता त्यापैकी तीन हजार ५६ जण बाधित आढळून आले आहेत. उपचारादरम्यान ६१ कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून सध्या ४२ कोरोनाबधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सीमा दोडमणी यांनी दिली.
सांगोला तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २५ एप्रिल २०२० रोजी घेरडीत आढळून आला होता. त्यानंतर प्रादुर्भाव वाढत गेला. परिणामत: तालुक्यात १० हजार ९६६ जणांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यात ५५० जण पॉझिटिव्ह तर १० हजार ४१६ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. याशिवाय ३६ हजार ९३ जणांची रॅपिड ॲटीजेन चाचणी घेण्यात आली. त्यापैकी २ हजार ५०६ जणांची चाचणी पॉझिटिव्ह तर ३३ हजार ५८७ जणांची चाचणी निगेटिव्ह आली.
----
२ हजार ९५३ जणांची मात
कोरोनाबाधित रुग्णांवर सध्या खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २ हजार ९५३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असून कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
---
प्रशासनाच्या बैठकीत कडक धोरण
यासंदर्भात सांगोला पंचायत समिती बचत भवन याठिकाणी तहसीलदार अभिजित पाटील, निरीक्षक भगवानराव निंबाळकर, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, गटविकास अधिकारी संतोष राऊत, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, गटशिक्षणाधिकारी प्रकाश यादव यांच्यासह व्यापारी दुकानदार यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महसूल विभाग, नगरपालिका व पोलीस प्रशासनाने मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतराचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.