राजकुमार सारोळे
सोलापूर : कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत दक्षपणे काम सुरू केले असून, सोमवारी रात्री रेल्वेने प्रवास केलेल्या आणखी दोन संशयितांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी उपचारास असलेल्या चार जणांपैकी तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
दरम्यान पुण्या-मुंबईहून सोलापुरात रोज हजारोंचे लोंढे येत असून यांचीही प्राथमिक तपासणी करणे गरजेचे आहे, अशी भूमीका अनेक सोलापूरकरांनी घेतली आहे.
परदेश दौºयावरून आलेल्या व कोरोना आजाराची लक्षणे आढळलेल्या पाच जणांना यापूर्वी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मंगळवारी आणखी तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांना घरी जाऊन काळजी घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. आता एका रुग्णाचा अहवाल येणे बाकी आहे. सोमवारी रात्री आणखी दोन संशयितांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रेल्वेत त्यांनी प्रवास केलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात परदेशाहून परतलेल्यांवर करडी नजर ठेवण्यात येत असून, त्यांची चौकशी करून निगराणीखाली ठेवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील १९ कर्मचाºयांना मंगळवारी सकाळी घरी पाठविण्यात आले आहे. परदेशातून परतलेला एक तरुण भावाच्या संपर्कात आला होता. तो भाऊ झेडपीत काम करतो. त्याला संशयित म्हणून रुग्णालयात उपचारास दाखल केल्यावर झेडपीत भावाबरोबर संपर्कात आलेल्या कर्मचाºयांचा इतिहास तपासण्यात आला. त्यामुळे या विभागातील कर्मचाºयांना निगराणीसाठी घरी पाठविण्यात आले आहे. त्या संशयिताचा प्रयोग शाळेतील अहवाल निगेटीव्ह आल्यावर सर्वच कर्मचाºयांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
रेल्वे प्रवाशामुळे झाली धावपळ- परदेशातून परतलेल्या एका प्रवाशाने उत्तर सोलापूर तालुक्यातील लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सिद्धेश्वर एक्स्प्रेसने प्रवास केला होता. लग्नाला उपस्थित राहून तो ८ मार्चला कल्याणला परतला होता. त्यानंतर त्याला संशयित म्हणून उपचारास दाखल केल्यावर कोरोनाची त्याला लागण झाल्याचे दिसून आले. त्याने दिलेल्या माहितीवरून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाºयांनी याबाबत जिल्हाधिकाºयांना अहवाल पाठविला होता. त्यानुसार रेल्वेत त्याच्यासोबत असलेल्या दोन प्रवाशांना सोमवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. त्यांना संशयित म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल केले.
‘त्या’ खेळाडूंचा लागला शोध- दुबईला क्रिकेट खेळण्यासाठी गेलेले खेळाडू मुंबईत परतले होते. तपासणीसाठी पनवेल रुग्णालयात दाखल केल्यावर सोलापूर जिल्ह्यातील दोन खेळाडूंनी तपासणीनंतर पलायन केले होते. याबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी त्यांचा शोध घेऊन तपासणी केली. त्यांची प्रकृती चांगली असून, घरामध्येच १४ दिवस आराम करण्याच्या अटीवर सोडण्यात आले.
बाजार समितीचे लिलाव सुरूच राहणार- बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी शंभरकर यांची भेट घेऊन बाजार समितीत शेतीमाल घेऊन गर्दी होत असल्याचे निदर्शनाला आणले. भाजीपाला, अन्नधान्य ही बाब अत्यावश्यक सेवेत येत असल्याने शेतकºयांची गर्दी होऊ न देता तीन टप्प्यात लिलाव करा, अशा सूचना दिल्याची माहिती शंभरकर यांनी दिली. जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील आठवडा बाजार बंद करण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाजारपेठेत भाजीपाला येत असल्याने ही बाब महत्त्वाची आहे. इतर धार्मिक स्थळांमधील गर्दी कमी करण्याबाबत संबंधितांशी बातचीत सुरू आहे. पंढरपूर मंदिरातील नित्योपचार सुरूच राहतील. अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील ख्वाजा चिश्ती ट्रस्टीने गर्दी कमी करण्याबाबत स्वत:हून पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. मशीद, दर्गाह, मदरशा, चर्चमध्ये गर्दी होऊ नये म्हणून संंबंधितांची बैठक घेतली जाणार आहे.