----
संगेवाडी येथे वृक्षारोपण
सांगोला : कृषिदिनानिमित्त संगेवाडी (ता. सांगोला) येथील कृषी सहायक एस. एस. चव्हाण यांनी डाळिंब बागेत येऊन डाळिंबाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच गावात वृक्ष लागवड करुन नागरिकांच्या जीवनातील वृक्षांचे महत्त्व पटवून दिले. प्रत्येकाने आपल्या परिसरात नवनवीन प्रकारची वृक्ष लागवड करावी, असे आवाहन कृषी सहायक ए. एस. चव्हाण यांनी केले. यावेळी उपसरपंच राजू खंडागळे, माजी मंडलाधिकारी दामोदर वाघमारे, संतोष खंडागळे उपस्थित होते.
---
माळशिरसमध्ये शिक्षकांसाठी कार्यशाळा
वेळापूर : माळशिरस तालुक्यात मागील शैक्षणिक वर्षाच्या धर्तीवर विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी वर्क फ्रॉम होम या उपक्रमांतर्गत पहिली व दुसरीच्या शिक्षकांसाठी ऑनलाइन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख आणि विस्ताराधिकारी महालिंग नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा झाली. यावेळी सर्व केंद्रप्रमुखही उपस्थित होते. कार्यशाळेसाठी तंत्रस्नेही शिक्षक महेश गायकवाड, प्रदीप कन्हाळ, प्रेमनाथ रामदासी, स्मिता कापसे, पांडुरंग मोहिते, सीताराम ढेकळे, समीर लोणकर, गिरीजा नाईकनवरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन समीर लोणकर व केंद्रप्रमुख राजकुमार फासे यांनी केले.
---
सिंगल डीपीचे तांदुळवाडी येथे उद्घाटन
माळशिरस : तांदुळवाडी येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सिंगल फेज डीपीचे उद्घाटन तांदुळवाडी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक डॉ. नागेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वेळापूर महावितरणचे अभियंता भाऊसाहेब मोटे, त्याचबरोबर दोन वर्षांपूर्वी धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि तांदुळवाडी ग्रामपंचायत यांच्यामार्फत लावलेल्या झाडांचे पूजन करण्यात आले आणि नवीन वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच भामाबाई जाधव, उपसरपंच शशिकांत कदम, सदस्य सतीश कदम, विकास चव्हाण, अनिल लोखंडे, भीमाशंकर गुजर, जांबुवंत मासाळ, माऊली धनवडे, शंकर लोखंडे, कृष्णदेव शिंदे, तेजस जाधव, विक्रम कारंडे, दामोदर चव्हाण उपस्थित होते.
---