सोलापुरातील यंत्रमागाची पडझड चालू असूनही इथल्या नवशिक्षित तरुण कारखानदारांच्या धाडसी पुढाकाराने ‘टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन’च्या नेतृत्वाखाली टेरीटॉवेल्सच्या तीन दिवसांच्या जागतिक प्रदर्शनाचा शुभारंभ आज संपन्न होत आहे. संपूर्ण जगभरात टेरीटॉवेलचे असे प्रदर्शन पहिल्यांदाच होत आहे. प्रदर्शनासाठी जगभरातून अंदाजे २०० परदेशी ग्राहक, ३००० ग्राहक, व्यापारी, व्यावसायिक कंपन्या, बँकर्स, ठोक खरेदीदार, विके्र ते येणार असून, प्रदर्शनासाठी २ कोटींच्या वर खर्च अपेक्षित आहे.
सोलापुरी टेरीटॉवेल्सचे देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत ब्रँडिंग करण्यासाठी आणि सोलापुरातील वैशिष्ट्यपूर्ण जेकार्ड चादर तसेच टर्किश टॉवेल्सच्या उत्पादनासाठी महत्प्रयासाने मिळविलेल्या ‘जिओग्राफिकल इंडेक्स’च्या ‘जीआय ८’ आणि ‘जीआय ९’ या प्रमाणपत्राची ओळख जगभरातील ग्राहकांना करून देण्याची ही उत्तम संधी आहे. ज्यामुळे सोलापूर व्यतिरिक्त जगभरात इतर कोणालाही अशा टेरीटॉवेल व जेकॉर्ड चादरीच्या उत्पादनाची नक्कल करता येणार नाही. ही टॉवेल-चादर उत्पादकांनी केलेली अत्यंत महत्त्वाची उपलब्धी लोकांसमोर येईल.
सोलापुरातील जेकॉर्ड चादरींची नक्कल करून स्पर्धकांनी हलक्या वजनाची उत्पादने बाजारात विकल्यामुळेच सोलापुरी उत्पादन मागे पडले. परिणामी यंत्रमाग उद्योग अडचणीत आला. या प्रदर्शनाच्या निमित्ताने शहराची औद्योगिक प्रतिमा निश्चित उंचावली जाईल. सोलापूरचे नव्याने विधायक मार्केटिंग होईल. निर्यात वाढेल. उत्पादक, ग्राहक, व्यापारी, सर्वांना एकत्रित आणल्यामुळे सामूहिक प्रयत्नांची नवी वाट सापडेल. यंत्रमाग कारखानदारांमध्ये सामंजस्य वाढेल. एकमेकांचे पाय न ओढता उत्पादनाचा दर्जा, गुणवत्ता, वेळेत डिलिव्हरी, झीरो डिफेक्ट, याचे महत्त्व समजल्याने एकत्रित काम करण्याची मानसिक तयारी होईल, जगभरातील ग्राहकांच्या बदललेल्या आवडी-निवडी कळतील.
नवीन पूरक उत्पादनांची गरज लक्षात येईल. तसे आवश्यक बदल होतील. तुलना, स्पर्धा, उणिवा, समजून घेण्यातून ‘लोकल ते ग्लोबल’ नातं तयार होईल. कारखानदारांच्या पारंपरिक घरगुती पद्धतीच्या अल्पसंतुष्टी मानसिकतेत बदल होईल. व्यवस्थापन तंत्र, व्यावसायिक वृत्ती तसेच कौशल्यांची भर पडल्याने यंत्रमाग उद्योगाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
केवळ यंत्रमागधारकांच्याच फायद्यासाठी नव्हे तर सोलापूरसाठी उद्योगवृद्धीची तसेच रोजगार निर्मितीची संधी म्हणून याकडे पाहण्याची गरज आहे. प्रदर्शनासाठी पहिल्यांदाच सोलापुरात येणाºया लोकांसाठी सुविधा, शिस्त, व्यावसायिक वातावरण अशा गोष्टींची गरज पूर्ण करण्याची जबाबदारी महानगरपालिका, जिल्हा परिषद, चेंबर आॅफ कॉमर्स, विविध सहकारी संस्था, व्यावसायिक, व्यापारी, बँकर्स, रिटेलर्स, गुंतवणूकदार, सर्वसामान्य जनतेची असणार आहे. शहरातील रस्ते स्वच्छ ठेवणे, सिटी बसची वेळेवर सेवा, रिक्षा आणि तत्सम वाहतूक व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, विजेचा पुरवठा, अशा गोष्टींची जबाबदारी संबंधितांनी घ्यायला हवी.
शहरातील महाविद्यालये, संशोधन संस्था, विद्यापीठ, महाविद्यालये,औद्योगिक संस्था, अभ्यासकांनी सोलापूरची बलस्थाने आणि नवीन उद्योग व्यवसायाच्या संधी याविषयी येणाºया देश-विदेशातील लोकांशी सकारात्मक संवाद साधतील. त्यातून कौशल्याची नेमकी गरज लक्षात घेऊन कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्रे उभारली जातील. याचा संबंधित शासकीय प्रशासकीय विभागांनी विचार करावा. केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांमधून निर्यात वृद्धीसाठी वेअर हाऊसेस, डॉकयार्ड, यार्न बँक असे ठोस उपाय केले जातील. हे प्रदर्शन केवळ यंत्रमाग कारखानदारांचे नव्हे तर इथल्या कामगार, त्यांच्या संघटनांच्याही भावना वाढायला मदत होईल.
कारखानदारांनी कामगारांना, संघटनांना विश्वासात घेऊन त्यांचा सकारात्मक सहभाग घेतला पाहिजे. शहरवासीयांनी आपले गैरसमज दूर करण्यासाठी प्रदर्शनाला भेट देऊन वस्तुस्थिती समजून घेतली तरच आपल्या लोकांकडून होणारी शहराची बदनामी टळेल आणि प्रदर्शनाचे हे धाडस फलदायी ठरेल. समस्त सोलापूरकरांनी विशेषत: परदेशातून येणाºया मंडळींना योग्य प्रतिसाद देऊन हे शहर त्यांच्या स्मरणात कायमचे राहील, अशी वातावरण निर्मिती करावी तरच एकेकाळी गिरणगाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहराची बदनामी टळेल आणि नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात होईल. - प्रा. विलास बेत(लेखक सामाजिक चळवळीत कार्यरत आहेत.)