राजकुमार सारोळे
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक रणांगण मला नवीन नाही. माझ्यापुढे महाराज असो किंवा आणखी कोणी पॉवरफुल्ल, युद्ध करण्यास मी तयार आहे, असे विधान करीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पाचव्यांदा लोकसभेच्या निवडणूक रणांगणात उतरले आहेत. मागील निवडणुकीत त्यांची लढत भाजपाशी झाली होती, पण यावेळेस वंचित बहुजन आघाडीने कडवे आव्हान उभे केले आहे.भाजपाने सोलापूर लोकसभा मतदारसंघात यावेळेस पक्षाचे विद्यमान खासदार अॅड. शरद बनसोडे यांचे तिकीट कापून गौडगावचे (ता. अक्कलकोट) डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली आहे. शिवाचार्य हे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले आहेत, मी नकारात्मक नाही व कोणावरही टीका करणार नाही, माझी लढाई स्वत:विरूद्ध आहे, असे ते सांगत आहेत. शिवाचार्य यांच्या उमेदवारीने भक्तगण आणि राजकीय कार्यकर्ते यांच्या एकीचे गणित जुळवले जात आहे.पाचव्यांदा निवडणूक लढवित आहात, मागील वेळेपेक्षा यावेळी वातावरण कसे आहे ?सन २0१४ मध्ये मोदींची लाट होती. त्यामुळे देशभर त्याचा परिणाम जाणवला. गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे यावेळेस आमच्या दृष्टीने पोषक वातावरण आहे. जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही सामोरे जात आहोत.वंचित बहुजनआघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर आपल्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत, त्याचा कितपत परिणाम होईल ?काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. कोणी कुठे उभे रहावे हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. निवडणूक ही युद्धभूमी आहे. यात कोण येतो, कोण जातो, सामना तर करावाच लागतो. परिणाम काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही.तुमची खरी लढाई कोणाबरोबर आहे ?माझी लढाई भाजपाविरूद्ध आहे. भाजपा जातीधर्मावर राजकारण करीत आहे. मोदी हुकुमशहा राजवट आणू पाहत आहेत. शेतकरी, कामगारांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. गरीब जनता त्रस्त आहे. सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन मी जनतेसमोर जात आहे. आत्तापर्यंत जिथे फिरलो तेथे लोकांनी या तक्रारी केल्या आहेत.भाजपातर्फे तुमचे नाव चर्चेत आल्यावर धर्मगुरूंनी निवडणूक लढवू नये म्हणून विरोध झाला, त्याकडे कसे तुम्ही पाहता ?धर्म आणि दंड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. धर्म म्हणजे नैतिकता व दंड म्हणजे शासन. दंड नसेल तर अराजकता माजू शकते. म्हणून राजदंड घेऊन राजकारण नव्हे तर समाजकारण करणार आहे.राजकारणात खोटे बोलणे, टीका करावी लागते, विरोधकांनी केलेल्या टीकेला कसे उत्तर देणार?मी नकारात्मक नाही, त्यामुळे कोणावर टीका करणार नाही. मी स्वत:च सात्विक सकारात्मक असल्याने जे आहे तेच बोलेन. मानवकल्याण, सर्वधर्मसमभाव व आम्ही सर्व भारतीय यासाठी मी निवडणूक लढवित आहे.धर्मगुरूंनी मतासाठी लोकांसमोर हातजोडावेत का ?माझी लढाई कोणाबरोबर आहे हे लोक ठरवतील. विचाराच्या देवाण घेवाणीवर माझा भर आहे. नकारात्मक विचार कोणीच स्वीकारणार नाही. मतासाठी मी लोकांना हात जोडणार का असेही प्रश्न आले. मी जिथे जातो तेथे लोक असतात. लोकांच्या मनात परमात्मा वास करीत असतो. त्यामुळे मी त्यांच्यासमोर हात जोडलो तर त्यात गैर काय ?वंचित बहुजन आघाडीतर्फे मतदारसंघात अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. सप्टेंबर २0१८ मध्ये सोलापुरात झालेल्या मेळाव्यास प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयामुळे बहुजन समाज प्रथमच सर्व गटतट सोडून एक होत आहे. त्यामुळे मताच्या फाटाफुटीचा फायदा कोणाला होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.सोलापुरातून लढण्याचा का निर्णय घेतलात ?सोलापुरात घेतलेल्या मेळाव्यावरून लक्षात आले की येथील मागासवर्गीय लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. येथून काँग्रेसतर्फे प्रतिनिधीत्व केलेले सुशीलकुमार शिंदे यांनी या समाजासाठी काय केले असा प्रश्न पडतो. त्यामुळे वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी उमेदवारी दाखल केली.तुमची लढाई कोणाशी व प्रचारात मुद्दे काय असतील ?माझी लढाई काँग्रेसशी आहे. सुशीलकुमार शिंदे केंद्रीय गृहमंत्री होते. त्यांच्याकडे बीएसएफ, पॅरॉमिलिटरी होती. आरक्षित जागेवरून निवडणूक लढवून येथील समाजासाठी त्यांनी काय दिले ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता लोकच सांगतील की त्यांनी वंचितांना काय दिले ते.कोणाच्या आग्रहामुळे उमेदवारी दाखल केली ?मी कुठून उभे रहावं असं काही बंधन नाही. महाराष्ट्रच काय देशात कोठेही मी निवडणूक लढवू शकतो. नव्या पिढीच्या हातात कारभार देण्याचे माझं स्वप्न आहे. काही जणांची राजेशाही, सरदारकी झाली आहे. ही सरदारकी संपवून लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे, यासाठी मी निवडणूक लढवित आहे.