साेलापूर : धर्मवीर संभाजी तलावात पायडल बाेटिंग, स्पीड बाेटिंगसह शिकाराची सफर करता येईल. वर्कऑर्डरचा प्रस्ताव सभागृहाकडे पाठविण्यात आला आहे. तलावात लवकरच दाेन पाण्याचे कारंजे बसविण्यात येणार असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी सांगितले.
धर्मवीर संभाजी तलावातील गाळ काढण्याचे काम झाले आहे. जलपर्णीही हटविण्यात आल्या आहेत. जलपर्णी काढण्याचे काम यापुढील काळात सुरूच राहणार आहे. यादरम्यान, पालिका प्रशासनाने तलावात बाेटिंग सफरसाठी मक्तेदार नेमण्याची निविदा काढली हाेती. युनिटी कंपनीला ही निविदा मंजूर झाली. ही निविदा दहा वर्षांसाठी आहे. दर महिन्याला सात हजार रुपये आणि वर्षाला १० टक्के दरवाढ असेल. या कंपनीने यापूर्वी नळदुर्ग किल्ल्याच्या सुशाेभीकरणाचे काम केले आहे. याठिकाणी बाेटिंगही सुरू आहे.
धर्मवीर संभाजीराजे तलावात यापूर्वी एक अपघात घडला हाेता. हा अनुभव विचारात युनिटी कंपनीने अपघात घडू नये याची काळजी घ्यावी. पर्यटकांना सफर घडविताना इतर सुरक्षा उपाययाेजना कराव्यात अशा अटी घातल्याचे सहायक आयुक्त विक्रमसिंह पाटील यांनी सांगितले. या कंपनीने पायडल बाेटिंग, स्पीड आणि शिकारा बाेटिंग सुरू करायचे आहे. तलावात लवकरच दाेन कारंजे बसविण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्या पाेर्टलवर निविदा काढण्यात आली हाेती. या कामासाठी पाच लाख रुपयांचा खर्च हाेणार असून, मार्च महिन्यात हे काम पूर्ण हाेईल, असे सार्वजनिक आराेग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी सांगितले.
---
शाळा भाड्याने देण्याच्या निविदेला मुदतवाढ
महापालिकेने शहरातील नऊ शाळांच्या जागा व इमारती भाड्याने देण्याची निविदा काढली हाेती. या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने मुदतवाढ देण्यात आल्याचे सहायक आयुक्त विक्रमसिंह पाटील यांनी सांगितले.