सोलापुरात तृतीयपंथीयांनी केले गौरी आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 12:48 PM2018-09-16T12:48:11+5:302018-09-16T13:10:14+5:30

गौरी-गणपतीचा सण सर्वांसाठी आनंददायी अन् सुखदायी. गणरायाच्या आगमनानंतर घरोघरी शनिवारी सायंकाळी गौरींचे आवाहन झाले.

tritiyapanthi celebrated manglagauri festival in solapur | सोलापुरात तृतीयपंथीयांनी केले गौरी आवाहन

सोलापुरात तृतीयपंथीयांनी केले गौरी आवाहन

Next

यशवंत सादूल 

सोलापूर : गौरी-गणपतीचा सण सर्वांसाठी आनंददायी अन् सुखदायी. गणरायाच्या आगमनानंतर घरोघरी शनिवारी सायंकाळी गौरींचे आवाहन झाले. त्याचवेळी भक्त असणाऱ्या तृतीयपंथीयांच्याही भक्तीला उधाण आले. देसाईनगरात राहणारी ही मंडळी एकत्र आली अन् ‘आली लक्ष्मी आली...सोनपावलांनी आली’ असं म्हणत त्यांनी सामुदायिकपणे गौरी आवाहन केले. गौरी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी तृतीयपंथीय मंडळी सुवासिनींना घरी ओटी भरणं आणि मिष्टान्न भोजनासाठी आमंत्रित करणार आहेत.

खरं म्हणजे ही परंपरा गेल्या अठरा वर्षांपासून सुरू आहे. पण समाजाकडून वेगळे मानले जाणाऱ्या ‘या’ समाजाला प्रसिद्धीचा फारसा सोस नसल्यामुळे ते त्यांच्या वस्तीतच गौरी - गणपतीचा सण साजरा करायचे अन् आपल्या लोकांमध्ये आनंदोत्सव साजरा करायचा पण समलिंगी संबंधाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या निकालानंतर सोलापुरातील तृतीयपंथीय मंडळी जाहीरपणे एकत्र आली अन् या निकालावर जल्लोष साजरा केला. यावेळी आपल्या आनंदोत्सवात त्यांनी इतरांनाही सहभागी करून घेतले. आपल्या भावना व्यक्त केल्या. आपणही माणूस आहोत आणि तशीच इतरांनी आपणाला वागणूक द्यावी, ही त्यांची माफक अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. त्याचवेळी काही मंडळींसमोर तृतीयपंथीय समाजाच्या परंपरा, सण, उत्सवाबाबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान प्रस्तुत प्रतिनिधीला त्यांच्या सामुदायिक गौरी-गणपती सणाची माहिती मिळाली. या सणामध्ये सहभागी होण्याची त्यांनी रितसर परवानगीही दिली.

पंचांगशास्त्राने गौरी आवाहनाचा शनिवार सायंकाळचा मुहूर्त दिल्यानंतर त्यानुसार देसाईनगरातील मालिनी बगले या तृतीयपंथीयाच्या निवासस्थानी गौरी आवाहनाची तयारी करण्यात आली. अंगणात सडा संमार्जन करून अत्यंत आकर्षक आणि भव्य रांगोळी काढण्यात आली. रंगावलीच्या माध्यमातून अंगणात लक्ष्मीची पावले काढण्यात आली. संपूर्ण परिसर अत्यंत स्वच्छ करण्यात आला होता. सूर्य मावळतीकडे गेल्यानंतर मालिनी उर्फ शिवा यांच्या घरासमोर अनिता बगले, शंकर गायकवाड, रुपेश निराळे, शिवा वडनाल, नरसय्या बिल्ला, गिरीश सुरवसे, रेणुका बगले, कमलेश बगले एकत्र आले अन् गोड स्वरांमध्ये ‘आली आली माझी गौराई अंगणी आली’ हे गौरी आवाहनाचे गीत गाण्यास सुरूवात केली. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींच्या मुखवट्यांना घरात आणताना ताटातील कुंकवाच्या पाण्यात पाय बुडवून स्वत:ची पावले उमटवित, उमटवित उंबरा ओलांडून घरात प्रवेश करण्यात आला. त्यावेळी लक्ष्मीमातेचा जयजयकार झाला. घरामध्ये गौरीसाठी तयार करण्यात आलेल्या मंडपात गौरीची स्थापना करण्यात आली. पुन्हा जयजयकार झाला अन् एकसुरात सर्वांनी आरती म्हणून प्रसाद घेतला.

महालक्ष्मीसमोर विविध रंगी आणि आकाराच्या खेळणी अन् फुलांची सजावट केली जाते. आठ-दहा दिवसांपासून या उत्सवाच्या तयारीसाठी तृतीयपंथीय एकत्र येतात. मिठाई बनवतात. शहर व परिसरातील नागरिक गौरीदर्शनासाठी त्यांच्याकडे मोठी गर्दी करतात. तृतीयपंथीयांच्या पूजेचे स्वरुप विधिवत असून, कन्नड भाषेतील आरती हे या पूजेचे वैशिष्ट्य आहे. 

अन्य वस्त्यांमध्ये सणाचा आनंद

सम्राट चौक-धनराज घोडकुंबे, नई जिंदगी-पिंकी बंडगर, साईबाबा चौक- सदानंद कुरापाटी, स्वागत नगर -रुपेश निराळे, गोदूताई विडी घरकुल-नरसय्या मामड्याल आदींसह शहरातील विविध ठिकाणच्या तृतीयपंथीयांच्या घरात गौरींचे आगमन झाले. एकमेकांच्या घरी हळदी-कुंकवासाठी जातात. त्यांच्या घरच्या लक्ष्मीचे दर्शन घेतल्याने भरभराट होते अशी सर्वसामान्यांची श्रद्धा असल्याने दर्शनासाठी तृतीयपंथीयांच्या घरी गर्दी होते. 

Web Title: tritiyapanthi celebrated manglagauri festival in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.