सोलापूर : बंगळुरूहून पुण्याकडे निघालेला ईव्हीएमचा मशिनचा कंटेनर महापुरामुळे सोलापुरात दाखल झाला. या कंटनेरमध्ये हॅक झालेल्या ईव्हीएम असल्याचे मानून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ट्रकसमोर घोषणाबाजी केली. या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात तक्रारही दिली. शंकेचे निरसन झाल्यानंतर कार्यकर्ते कंटेनरपासून बाजूला झाले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाºया कार्यकर्त्यांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. बंगळुरूहून पुणे आणि जळगावकडे निघालेले ईव्हीएमचे कंटेनर शासकीय विश्रामगृहात थांबला होता़ या कंटेनरसोबत आलेले महसूल अधिकारी, कंटेनर चालक, सुरक्षा रक्षक रविवारी मुक्कामाला होते. शासकीय विश्रामगृहात एरवी मोठी वाहने थांबत नाहीत. या कंटेनरमध्ये काय आहे, अशी विचारणा कार्यकर्त्यांनी चालकाकडे केली. त्याने ईव्हीएम मशीन असल्याचे सांगितले.
कार्यकर्त्यांनी ही गोष्ट आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांच्यासह उपस्थित नेत्यांना सांगितली. परंतु, या कंटेनरच्या दरवाजांना कुठल्याप्रकारचे सील नाही. दरवाजाला लावलेले कुलूप हलक्या प्रतिचे आहे. ही ईव्हीएम वाहतूक संशयास्पद आहे, असे म्हणत कार्यकर्त्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली.
सध्या कुठल्याही निवडणुका नाहीत. तरीही ईव्हीएम कोणत्या कारणासाठी घेउन जात आहात, असा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली. सदर बझार पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस आणि महसूल अधिकाºयांनी कार्यकर्त्यांचे शंका निसरन केले. मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली. ईव्हीएम विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
महाराष्ट्र पुरात अडकला आहे. त्यात ईव्हीएम वाहतूक करण्याची काय गरज आहे. देशभरात ईव्हीएम मशीनबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. कोणत्याही प्रकारचे सील नसताना ईव्हीएमची वाहतूक केली जात आहे. अशा प्रकारे संशयास्पद पध्दतीने वाहतूक केली जात असल्याची बाब प्रकाश आंबेडकर यांच्या कानावर घातली. त्यांच्या आदेशानुसार आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली आहे. - आनंद चंदनशिवे,
प्रदेश प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बंगळुरू येथील भेल कंपनीकडून ईव्हीएम मागविले जात आहेत. पुणे आणि जळगावसाठी आलेले कंटेनर कोल्हापूर मार्गे जाणार होते. परंतु, महापुरामुळे ते सोलापूरमार्गे आले. शासकीय विश्रामगृहात घडलेल्या प्रकाराबद्दल कार्यकर्त्यांच्या शंकेचे निरसन करण्यात आले आहे. - स्नेहल भोसलेउपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, सोलापूर.