टेंभुर्णी : सिमेंटचा ट्रक अडवून चालक व मालकाला चाकूचा धाक दाखवून १ लाख १९ हजार रुपये लुटल्याचा प्रकार घडला.
सोलापूर- पुणे रस्त्यावर मोडनिंब येथील उड्डाणपुलाजवळ शनिवार पहाटे ३.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत ट्रक मालक रवींद्र दत्तू परबत (रा. इंदापूर) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वाटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार रवींद्र दत्तू परबत व चालक हैदर आमिन पठाण (रा. अंजनगाव उमाटे, ता. माढा) हे दोघे तांडूर येथून ट्रक (एम.एच.- १२ -७१७४) मधून सिमेंटच्या गोणी भरून पुण्याकडे निघाले होते. शनिवारी पहाटे ३.३० च्या सुमारास ट्रक मोडनिंब येथील उड्डाणपुलावर आला असता मोटारसायकलवरून आलेल्या नऊ अनोळखी व्यक्तींची टोळी आली. त्यांनी तो ट्रक अडविला. प्रसंगावधान ओळखत चालकाने ट्रक न थांबवता पुढे तसाच दामटून नेला. त्यानंतर ही टोळी मोटारसायकलवरून पाठलाग करत एक किलोमीटर आले. समोरील काचेवर दगड मारून त्यांनी ट्रक थांबवण्यास भाग पाडले. ट्रक थांबताच त्यांच्यापैकी दोघे चालकाच्या केबिनमध्ये शिरले आणि रवींद्र परबत यांच्या गळ्यावर चाकू लावून पैशाची मागणी केली.
पैसे नाहीत म्हणताच त्यांनी चालक व मालक या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांनी एक प्रकारे दहशत निर्माण केली. केबिनमधील पेटीत ठेवलेले १ लाख १९ हजारांची रोकड हिसकावून खाली उतरले. खाली उतरताना त्या दोन चोरट्यांनी तोंडाला बांधलेले कापड काढले होते. त्या दोघांना रवींद्र परबत यांनी पाहिले. यानंतर या टोळीने तेथून पळ काढला.
----
ओळखपरेडमध्ये दोघांना ओळखले
वाटमारीचा प्रकार समजताच पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. काही संशयितांना ओळखपरेडसाठी पोलीस ठाण्यात आणले. टोळीतील काही संशयितांची पोलिसांनी ओळख परेड घेतली. ट्रक मालकाने नऊपैकी दोन आरोपींना ओळखले आहे. सागर सुनील मसूरकर आणि सौरभ माळी (रा. अंजनगाव खेलोबा, ता. माढा) अशी ओळख पटलेल्या आरोपींची नावे आहेत. आता उर्वरित सात जणांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.