दप्तराचे ओझे या विषयावर वारंवार चर्चा होते, परंतु दप्तराचे ओझे का आहे? याचा विचार मुळात जाऊन कोणीच करायला तयार नाहीत. प्रसारमाध्यमे अयोग्य व अशास्त्रीय माहिती प्रसिद्ध करीत आहेत व पालकाचा संभ्रम वाढवित आहेत. प्रसिद्ध झालेले मुद्दे अयोग्य आहेत का हे स्पष्ट केले आहे.
गृहपाठ शाळेत घेणे : हा उपाय अयोग्य आहे. मुंबई प्राथमिक शिक्षण नियमावली १९४९ मधील नियम क्रमांक १२६ ची तरतूद स्पष्ट आहे़ त्याप्रमाणे इयत्ता पहिली व दुसरीसाठी गृहपाठच नाही, तसेच इयत्ता तिसरी व चौथीसाठी अनुक्रमे अर्धा व एक तासाचा गृहपाठ विहित केला आहे. गृहपाठ शाळेतच करावा असे सुचवले आहे हे अयोग्य आहे मग तो गृहपाठ राहणारच नाही व अभ्यास करण्याचा मूळ शैक्षणिक उद्देश नष्ट होतो हे लक्षात घेतले जात नाही. वेळापत्रकाची मोडतोड : वेळापत्रकात रोज तीनच विषय समाविष्ट करा हे अयोग्य आहे म्हणजे रोज फक्त तीन विषय शिकवा असा अर्थ होतो हे अयोग्य आहे.
शालेय अभ्यासक्रमात अनेक विषय आहेत. विषय, त्याचा महत्त्वाचा घटक, काठिण्य पातळी, मानसिक स्थिती व वेळेची आणि हवामान स्थिती (सकाळ, दुपार व संध्याकाळ) विचारात घेऊन वेळापत्रक तयार केले जाते. ही शास्त्रीय पद्धत आहे. याऐवजी सलग तीनच विषय एका दिवशी शिकविणे अयोग्य आहे तसेच यामुळे अध्ययन परिणामकारक होत नाही. मग एवढे विषय ठेवलेच का?असा प्रश्न उपस्थित होतो? भाषा विषय पाठ्यपुस्तके : शाळेतच पुस्तके ठेवणे अयोग्य आहे. पाठ्यपुस्तकाशिवाय भाषा अध्यापन व अध्ययन होत नाही. तीन भाषा विषय आहेत व रोज भाषेचा तास असतो त्यामुळे भाषेची पुस्तके बरोबर ठेवावी लागतात व अध्यापन व अध्ययनासाठी पाठ्यपुसतके उपलब्ध असणे आवश्यक आहे.
सध्या मोफत पुस्तके दिली जात आहेत, म्हणून शाळेत जुनी पुस्तके उपलब्ध आहेत अन्यथा पुस्तके उपलब्ध होणे अवघड आहे व ते परवडणारेही नाही.सध्या यामुळे कागदाचा एवढा मोठा अपव्यय जगात कोठेही होत नाही तेवढा सध्या भारतात होत आहे हे जास्त दिवस चालणार नाही. संपत्ती अशी वाया घालविणे अयोग्य आहे. दोन संच देणे म्हणजे संपत्तीचा अपव्यय आहे असेच म्हणावे लागेल. इतर साहित्याचे ओझे : इतर साहित्याने ओझे वाढते असे म्हणणे अयोग्य आहे.
जेवणाचा डबा, पाणी, कंपास पेटी, रंगपेटी इत्यादी साहित्य कारण नसताना न्यावे लागते कारण शाळा घरापासून खूपच लांब आहेत त्यामुळे खाणे-पिणे या क्रिया घरीच शांतपणे होणे आवश्यक आहे, त्या होत नाहीत, परंतु मग शाळा लांब असल्यामुळे जेवणाचा डबा, पाणी, कंपासपेटी, रंगपेटी व इतर वस्तू आणण्यासाठी परत घरी जाता येत नाही त्यामुळे सर्व साहित्य शाळेत रोज न्यावेच लागते़ शरीराला त्रास होतो : अत्यंत अयोग्य आहे कारण आपल्याकडील अनेक मुलेही कमी वजनाची जन्माला येतात त्यामुळे त्याची वाढ अगोदरच योग्य नसते त्यात परत खाण्याची आबाळ होते, येण्या-जाण्यात वेळ वाया जातो त्यामुळे शरीरबांधा योग्य वाढत नाही मग दप्तराचे ओझे वाटते.
वाढीव अपेक्षा : मूल अडीच वर्षांचे झाले की लहान गटात प्रवेश सुरू होतो व त्याने अनेक भाषा गणित, विज्ञान, चित्रकला, नृत्य, संगीत, खेळ या अनेक विषयात यश मिळविले पाहिजे अशी अपेक्षा ठेवली जाते तसेच विविध स्पर्धा परीक्षा व इतर स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असे पालकांना वाटते. थोडक्यात मूल मोठे करण्याची घाई असते व त्यांच्या पालकांच्या अपेक्षा इच्छा यांचे दडपण मुलांवर असते यामुळेच विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे वाटू लागते.
उपरोक्त कारणमिमांसा समोर ठेवल्यास दप्तराचे ओझे कमी करता येते व त्या मूळ बदलाकडे व्यवहार्यतेने लक्ष देणे सोपे जाते.यासाठी खालील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम कमी करणे :अभ्यासक्रम कमी करण्यासाठी घटक कमी करावेत त्यामुळे तासिका कमी करता येतील व रोज प्रत्येक विषयाचा तास ठेवण्याची गरज राहणार नाही.यामुळे एक दिवसाआड प्रत्येक विषयाच्या तासिका ठेवता येतील. त्यामुळे त्याला प्रत्येक विषयाच्या पाठ्यपुस्तकाची गरज रोज राहणार नाही, एक दिवसाआड भाषा व इतर विषयांच्या तासिका वेळापत्रकात ठेवता येतील. घराजवळची शाळा उत्तम शाळा : प्रत्येक मुलास जवळच्या शाळेत प्रवेश घेणे बंधनकारक करण्यात आले पाहिजे. तसेच ती शाळा उत्तम शाळा असेल याकडे सर्व संबंधितांचे लक्ष हवे व शक्य आहे. यामुळे मुलाचा वेळ वाचेल, सायकल वापरतील मधल्या सुट्टीत घरी जाता येईल. तसेच घरूनच येतानाच जेवण व्यवस्थित केले तर शाळेत डबा आणायची गरजच राहणार नाही.
स्वगतीने शिक्षण : सर्व मुले एकसमान गतीने शिकत नसतात म्हणून ज्याची गती कमी आहे त्या गतीप्रमाणे शिकविले गेले पाहिजे.यासाठी अभ्यासक्रम हा विद्यार्थ्याचे मानसिक वय समोर ठेवून ठरविले पाहिजे तरच मुले त्याच्या गतीने शिकू शकतात-दिलीप सहस्त्रबुद्धे(लेखक हे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आहेत)