रास्ता रोको अन् जागरण गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूल : सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण असणारा कुरूल-पंढरपूर मार्गावर तिऱ्हे परिसरातील रस्ता खचून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने या खड्ड्यात पाण्याची जणू डबकी तयार झाली आहेत. कसरत करत रस्ता पार करावा लागत आहे.
कुरूल-पंढरपूर हा तिऱ्हे मार्ग या रस्त्याकडे सध्या लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. अनेक वर्षांपासून हा राज्य मार्ग जसा आहे तसाच आहे. सध्या पावसाचे दिवस असून, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दरवर्षी एक विशिष्ठ ठेकेदार या रस्त्यावरील खड्डे बुजवतो. परंतु महिन्याच्या आत येथील खड्डे पुन्हा होतात. त्यामुळे या रस्त्याचे मजबुतीकरण होणे गरजेचे आहे.
सोलापूर- मोहोळ-पंढरपूर व सोलापूर-मंगळवेढा या दोन रस्त्यांना पालखी मार्गासाठी गर्दीच्या वेळी पर्यायी मार्गे म्हणून वापरला जातो. शिवाय या मार्गावरून वारीच्या वेळेस अनेक पालख्या येतात त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे अत्यावश्यक आहे, परंतु अद्याप तरी या विषयी काही प्रकिया सुरू झाल्याचे दिसत नाही.
--
प्रस्ताव दोनवेळा नाकारला
कुरूल-टाकळी सिकंदर-पंढरपूर हा मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील रस्त्याच्या मजबुतीकरण कामाचा प्रस्ताव पंढरपूर बांधकाम विभागाने तयार केला आहे. हे काम आशिया विकास बँकेच्या निधीतून होणार आहे. मात्र दोन वेळेला सदरचा प्रस्ताव नाकारला आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी स्थानिक आमदार यशवंत माने प्रयत्न करीत आहेत. उन्हाळ्यात कुरुल,अंकोली येथून सोलापूर-सांगली राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने जड वाहनातून मुरूम वाहतूक केल्याने हा रस्ता खचून खराब झाला आहे. संबंधित कंपनीकडे रस्ता दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश क्षीरसागर यांनी सांगितले.
---------
वाघ्या-मुरळीचा जागर गोंधळ
या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचा प्रस्ताव दोन वर्षांपासून तांत्रिक मंजुरीच्या फेऱ्यात अडकला आहे. या रस्त्याला कामाला मुहूर्त लागत नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, सध्या पडलेले मोठे खड्डे तातडीने बुजवावेत आणि नवीन रस्त्याचे कामही त्वरित मार्गी लावावे अन्यथा मंगळवार, दि. २७ जुलै रोजी सोलापूर-पंढरपूर तिऱ्हेमार्गे रस्त्यावर कुरुल येथे सकाळी ११ वाजता रास्ता रोको व प्रशासन आणि सरकारला जाग आणण्यासाठी वाघ्या-मुरळीचा जागर गोंधळ कार्यक्रम करणार असल्याचा इशारा महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष अमोल माळी यांनी दिला आहे.
---
सध्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत ते त्वरित दुरुस्त करण्यासाठी विभागाकडे प्रस्ताव दिला आहे. पाऊस कमी झाला की खड्डे भरण्याचे काम सुरू होईल
- गणेश क्षीरसागर
उपकार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग
------
फोटाे : २२ कुरूल
कुरूल-पंढरपूर रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे.